शहरातील उद्यानांची दुरवस्था

करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने टाळेबंदीचे र्निबध शिथिल केल्याने शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

करोना काळापासून पालिकेचे देखभालीकडे दुर्लक्ष 

विरार :  करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने टाळेबंदीचे र्निबध शिथिल केल्याने शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पण करोना काळात ही उद्याने बंद असल्याने अनेक ठिकाणच्या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील साहित्य मोडकळीस आले आहे. करोनाचे र्निबध शिथिल झाल्यानंतर उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र करोना काळात बंद असलेल्या उद्यानांची देखरेख न झाल्याने उद्यानांची दुरवस्था झाली आहे.

पावसामुळे उद्यानांमधील विविध प्रकारची साधने गंजून खराब झाली आहेत. उद्याने खुली करताना त्याची साफसफाई आणि साहित्याची डागडुजी करणे आवश्यक होते. पण याकडे पालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. करोना काळात उद्याने बंद असल्याने तिथे कुणाचा वावर नव्हता यामुळे त्याची देखभालच झाली नाही. या उद्यानांची देखभाल करण्याचा ठेका हा महिला बचतगटांना देण्यात आला आहे. पण त्यांच्याकडूनही आवश्यक ती दखल घेतली गेली नाही. परिणामी उद्याने दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत.  

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात १३५ उद्याने आहेत. बहुतांश सर्वच उद्यानांची दयनीय अवस्था झाली आहे. उद्यानांत नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.  गवत आणि झाडेझुडपे वाढले आहे. यामुळे सरपटणाऱ्या जनावरांची भीती वाढली आहे. तसेच पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. अनेक रोपटे, फुलांची झाडे मरून पडली आहेत. झाडांची छाटणी आणि खतपाणी न मिळाल्याने अनेक ठिकाणी झाडेही मरत आहेत. 

  दुसरीकडे कोटय़वधी रुपये खर्च करून महानगरपालिकेने उद्यानात खेळाचे आणि व्यायामाचे साहित्य बसविले होते. पण पावसामुळे हे साहित्य पूर्णपणे जीर्ण झाले आहे. अनेक उद्यानात सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याने काही उद्यानांमध्ये साहित्य चोरीला गेले आहे. अनेक ठिकाणाचे दिवे बंद आहेत. उद्यानाचे कठडे तुटून पडले आहेत. तर काही ठिकाणी लावलेली उपकरणे गायब झाली आहेत.  काही उद्यानांत रात्रीच्या वेळी मद्यपी, चरसी आणि गुडांनी आपले बस्तान बसवले आहे.

वसई विरारमधील नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, सनशाइन गार्डन, आचोले तलाव, मोरेगांव तलाव, नालासोपारा पश्चिम येथील फनफिस्टा गार्डन, महेश पार्क, मनवेलपाडा, पापडी, गोखिवरे, सातीवली, वालिव, धानिवबाग, बोलिंज, छेडानगर इत्यादी ठिकाणच्या उद्यानांतील खेळाची, व्यायामाची साधने तुटून खराब झाली आहेत. तर काही ठिकाणाची साधनेच गायब झाली आहेत. प्रभातफेरी आणि विरंगुळ्यासाठी नागरिकांची गर्दी उद्यानात दिसत आहे. पण मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानांतील शौचालयेही बंद खराब झाली आहेत.

सध्या उद्याने खुली करण्यात आली आहेत. उद्यानांच्या स्थितीविषयी माहिती घेण्याचे काम सुरूआहे. त्यात जेथे साहित्यांची नासधूस झाली आहे, नादुरुस्त आहेत, त्यांची पाहणी केली जात आहे. लवकरच सर्व साहित्य दुरुस्त अथवा बदलले जाणार आहे. 

चारुशीला पंडित, उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poor condition city parks ysh

Next Story
औद्योगिक वसाहतीत घाणीचे साम्राज्य
ताज्या बातम्या