वसई: गरोदर महिला, स्तनदा माता आणि ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील मुलींना महिला व बालकल्याण विभागाकडून पोषण आहार पुरवला जातो. सदर आहार अधिक पौष्टिक व रुचकर करण्यासाठी आहारामध्ये बदल करण्यात आले आहेत. , आता पोषण आहारात पुलावाचा समावेश करण्यात आला असून,प्रीमिक्ससह देण्यात येणाऱ्या मसाल्याच्या पाकिटांमुळे पोषण आहाराची लज्जत वाढणार आहे.
राज्यातील महिला व लहान मुलींना सकस आहार मिळावा यासाठी सरकारकडून विविध योजना आणि उपक्रम राबविले जातात. तर या उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून महिलांना घरपोच पोषण आहार पुरविला जात आहे. मात्र, यंदा शासनाकडून पोषण आहारात बदल करण्यात आले आहेत. गौरी-गणपतीच्या उत्सवापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून नवीन आहार वितरित करण्याचे नियोजन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी आदिवासी बहुल भागांमध्ये महिला व बालविकास विभागासोबतच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून गरोदर मातांपासून तर चिमुकल्या मुलांना सकस आहार मिळावा यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. त्यामुळे शासनाच्या या नव्या आहार बदलाचा फायदा पालघर जिल्ह्यातील स्तनादा माता, गरोदर महिला आणि ३ महिने ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना होणार आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी किती?
गरोदर महिला – ११ हजार ५८
३ महिने ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी – ५५ हजार ४४९
अंगणवाडी – ३ हजार ३५७
गरोदर माता आणि चिमुकल्या मुलांना देण्यात येणाऱ्या पौष्टिक आहारात शासनस्तरावरून करण्यात आलेले बदल आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पौष्टिक आहार अधिक चवदार बनणार असून जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यांमार्फत लाभार्थ्यांना घरपोच आहाराचा पुरवठा केला जाईल. व्यंकटराव हुंडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास, जिल्हापरिषद पालघर)
