वसई : मागील काही दिवसांपासून वसई पूर्वेच्या चिंचोटी ते पोमण या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होऊ लागला आहे. वीज नसल्याने याचा फटका सर्वसामान्य वीज ग्राहकांसह उद्योगांना बसू लागला आहे. विजेअभावी अनेकांना आपले करखाने बंद ठेवण्याची वेळ येत असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे.
मागील काही वर्षांपासून चिंचोटी पासून ते नागले या दरम्यान विविध ठिकाणी छोटे मोठे उद्योग कारखाने उभे राहिले आहेत. याभागात सुमारे तीनशे ते चारशे इतकी उद्योग कारखाने आहेत. यात या भागातील पन्नास हजाराहून अधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र या भागात आता विजेची समस्या निर्माण होऊ लागली आहे. मागील काही दिवसांपासून तासंतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा फटका कारखानदारांना बसू लागला आहे.
मागील दहा दिवस झाले दररोज वीज जाते त्यामुळे योग्य रित्या कामेही पूर्ण होत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. वीज नसल्याने कामकाज ठप्प होते. यात वेळेत उत्पादन निघत नाही तसेच जे कामगार काम करतात त्यांना ही बसून राहावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला दुहेरी नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे येथील कारखान दारांनी सांगितले आहे.
मागील काही वर्षात या भागात विविध उद्योग येत आहेत त्यामुळे गोरगरीब नागरिकांना काम मिळत आहे. परंतु वीज पुरवठा सुरळीत नसेल तर उद्योग टिकणार कसे असा प्रश्न ही सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र भोस्कर यांनी उपस्थित केला आहे.
या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत सोमवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या दालनात उद्योजक आणि महावितरण अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी उद्योजकांनी ही आक्रमक पवित्रा घेत महावितरण वीज समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. वीज नसेल तर आम्हाला उद्योग अन्यत्र घेऊन जाण्याची वेळ येईल यासाठी महावितरणने वीज वितरण व्यवस्था सुधारावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असून त्याचे निवारण करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न
चिंचोटी – कामण व पोमण हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे या भागात विजेची मागणी वाढल्याने वितरण व्यवस्थेत अति भार येऊ लागला आहे. सद्यस्थितीत नालासोपारा उपकेंद्रातून कामण असा वीज पुरवठा केला जात आहे. या भागातील वीज समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यात प्रामुख्याने १५ मीटरचे ११० मोनोपोल उभे केले जाणार आहेत.त्यापैकी ३५ मोनोपोल उभे झाले आहेत. तसेच महामार्गावर काम सुरू असताना काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांना धक्का लागल्याने वाहिन्या ब्रेक झाल्याने अडचणी येत होत्या. त्याठिकाणी सुद्धा नव्याने विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले असल्याचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.
पोमण येथील उपकेंद्र रखडले
वसई विरार वाढत्या नागरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यापैकी ७० टक्के वीज ही औद्योगिक क्षेत्राला लागत आहे. या औद्योगिक क्षेत्राचा विचार करता. महावितरणने पोमण येथे २२०/२२ केव्ही चे उपकेंद्र या भागात मंजूर केले आहे. मात्र अजूनही त्या कामाला गती मिळत नसल्याने या उपकेंद्राचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.