scorecardresearch

५४६ आकडे टाकून वीजचोरी ;वसई-विरारमध्ये महावितरणची कारवाई

वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात आकडे टाकून छुप्या मार्गाने वीज चोरी केली जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

वसई: वसई-विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात आकडे टाकून छुप्या मार्गाने वीज चोरी केली जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. याचा मोठा फटका महावितरणला बसत असून महावितरणने या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. वसई-विरारमध्ये आतापर्यंत ५४६ इतक्या आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे.
वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी विजेच्या वाहिनीवर आकडे टाकून (हुक) टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागत आहेत. यामुळे महावितरणला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी अशा वीज चोरांना आवर घालण्यासाठी मागील काही दिवसांपासून महावितरण विभागाने पथके तयार करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
वसई विभागातील वालीव, कोल्ही, जूचंद्र, गोखिवरे, नायगाव आदी भागात तर विरार विभागात मानवेलपाडा, गावडवाडी, व्हीएस मार्ग, कशिद कोपर, गणेशपुरी, भिवली, शिरवली, आरजे नगर, नालासोपारा पूर्व शाखा, साईनाथ नगर, महेश पार्क परिसर, निर्मल, निलेमोर, निलेगाव, उमराला, चिखल डोंगरी, नारंगी, टेंभी पाडा, आगाशी, संतोष भुवन, विजय नगर, गावराईपाडा या भागात धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात वसई विभागातून २७० तर विरार विभागातून २७६ अशा ५४६ इतक्या अनधिकृत वीज वापरण्यासाठी तारांवर टाकलेले आकडे काढून टाकत कारवाई केली असल्याचे महावितरणने सांगितले आहे. तर काही ठिकाणी वीजचोरीसाठी वापरलेल्या साहित्याची पथकाने होळी केली असून वीज कमतरतेच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
शोध मोहिमेत ५० लाखांहून अधिकची वीजचोरी
पंधरा दिवसांत राबवलेल्या वीजचोरी शोध माहिमेत वसई मंडलात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये ५० लाख रुपयांपेक्षा अधिकची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. वसई विभागात ५४ जणांकडे ११ लाख ९० हजार रुपये किमतीची ६७ हजार ४५१ युनिट तर विरार विभागात ६९ ठिकाणी ४१ लाख २७ हजार रुपयांची १ लाख १४ हजार ४६५ युनिट विजेची चोरी आढळली. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंते, साहाय्यक अभियंते, जनमित्र, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांच्या पथकांनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Power theft throwing numbers msedcl financial loss action vasai virar amy

ताज्या बातम्या