भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयाबाहेर पाणी आंदोलनासाठी बसलेल्या आदिवासी नागरिकांच्या आंदोलनस्थळाच्या अगदी समोर उपस्थित असतानाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिरा-भाईंदरमधील आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने ५७ टँकर पाण्याची मंजुरी दिली असली, तरी नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याविरोधात श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

दरम्यान, आंदोलनाची घोषणाबाजी सुरू असतानाच समोरील एका चहा विक्रेत्याकडे प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. संबंधित चहा विक्रेता कुटुंबाला मराठी असल्यामुळे घर नाकारण्यात आल्याच्या प्रकरणात त्यांच्या समर्थनार्थ सरनाईक तेथे आले होते. मात्र एका प्रकरणासाठी उपस्थित राहत असताना दुसरीकडे आदिवासींच्या आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.हे आंदोलन महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात करण्यात येत होते. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्राथमिक अधिकार पालिकेकडेच आहेत. तसेच, आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सरनाईक यांनी आंदोलनस्थळी जाणे टाळल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली.