भाईंदर :- मिरा-भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सुरू असलेल्या वादाचा मोठा फटका शहराच्या विकासाला बसत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच शहरातील विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला १३८ कोटी रुपयांचा निधी या वादामुळे ठाण्याकडे वळवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शहराच्या विकासासाठी शासनाकडून मदतीचा हात पुढे केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेने केलेल्या मागण्यांनुसार शासनाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार, मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीवरून शासनाने मागील दोन वर्षांत जवळपास १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
या निधीत प्रामुख्याने उत्तन कचरा प्रकल्प (१३ कोटी), नवीन मासळी मार्केट उभारणी (५ कोटी), पालिका मुख्यालय इमारत नूतनीकरण (९ कोटी), कोंडवाड्याचे नूतनीकरण (१ कोटी), नवीन कचरा प्रकल्प उभारणी (३९ कोटी), उत्तन मलनिस्सारण केंद्र (१२ कोटी), रुग्णालय एअर प्युरिफायर प्रणाली (५ कोटी), महाजन कलादालन (१४ कोटी), पेणकरपाडा कचरा प्रकल्प (९ कोटी), पेणकरपाडा कचरा कंपोस्टिंग प्रकल्प (३० कोटी) आदी कामांचा समावेश आहे.
मात्र, आता हा निधी शासनाने ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश नगरविकास विभागाकडून काढण्यात आले आहेत. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ही कामे होऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. परिणामी, विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी विनाकारण पडून राहू नये म्हणून तो ठाणे महापालिकेकडे वळवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे.दरम्यान, या संदर्भात नरेंद्र मेहता यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, शासनामध्ये युतीत असलेल्या या नेत्यांमधील वादामुळे शहराचे मोठे नुकसान होत असल्याचे आरोप केले जात आहेत.
