विरार / वाडा : मसाल्याच्या पदार्थाचे वाढते दर पाहता विकत आणलेल्या तयार मसाल्यापेक्षा घरगुती मसाल्याला पालघर जिल्ह्य़ात अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे मिरची खरेदीसाठी सर्वच किराणा दुकानांमध्ये महिलांची झुंबड उडाली आहे.
भेसळयुक्त चायनीज तयार मसाल्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यातच तयार मसाल्याचे दरही मोठय़ा प्रमाणात वाढले असल्यामुळे महिला मसाल्यातील घटकपदार्थ आणून घरातच मसाले तयार करत आहेत. दरवर्षी मे महिन्यात किराणा दुकानातून वेगवेगळय़ा प्रकारच्या (वाणांतील) मिरच्या व त्या मध्ये २० ते २५ प्रकारचे मसाल्याचे पदार्थ खरेदी करतात. मे महिन्याच्या कडक उन्हात मिरच्या सुकवून व मसाल्याचे पदार्थ भाजून मसाल्याच्या गिरणीत हा घरगुती मसाला तयार करुन वर्षभर त्याची साठवणूक केली जाते. शक्यतो मसाला एप्रिल, मे महिन्यात बनवणे चांगले असते, उष्णतामान अधिक असल्याने मिरची व मसाल्याचे पदार्थ चांगले सुकते त्यामुळे मसाला चांगला तयार होतो. कुठल्याही रासायनिक पदार्थाची भेसळ नसल्याची खात्री घरगुती मसाल्यामध्ये असते असे महिलांकडून सांगितले जाते.
मिरच्यांच्या दरात वाढ
मागील वर्षीच्या तुलेनेने यावर्षी ३० ते ४० रुपयांनी मिरच्याचे दर वाढले आहेत. मनवेल पाडा येथील थोरात मसाल्याचे मालक विजय थोरात यांनी माहिती दिली की, या वर्षी मिरचीचे दर किलोमागे ३० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. काश्मिरी मिरची ६०० रुपये किलो. बेडगी मिरची ४५० रुपये प्रतिकिलो, लवंगी मिरची ३००, पाण्डी मिरची ३०० तर संकेस्वरी मिरची ३८० रुपये किलो आहे. महागाई वाढत असल्याने अनेक महिला वर्षभराचा लाल तिखट मसाला तयार करून घेतात. यासाठी लाल मिरचीची मागणी वाढली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरगुती बनविलेलाच मसाला अन्नपदार्थात वापरतो. या मसाल्याने पदार्थ रुचकर बनले जात असल्याने समाधान मिळते. -चंचला (सुवर्णा) पाटील, गृहिणी, रा. धानिव.