विरार : वसई विरार महानगरपालिकेने मागील वर्षी जाहिरात धोरण ठरवून शहरातील बेकायदा जाहिरातधारकांना चांगलाच चाप लावला होता. पण पालिकेने ठरवून दिलेले जाहिरात दर आणि जाहिरात व्यावसायिक यांच्यात समन्वय निघत नसल्याने काही जाहिरात व्यावसायिकांनी यात पळवाटा शोधत आपले जाहिरात फलक, होर्डिग इतर ठिकाणी हलवले आहेत. त्यामुळे पालिकेचा कर बुडत आहे. म्हणूनच पालिकेने आता अशा जाहिरात व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा विचार केला आहे.

वसई विरार महानगरपालिकेने मागील वर्षी शहरातील सर्व होर्डिग, फलक आणि जाहिरात ठिकाणे यांचे सर्वेक्षण करत बेकायदा जाहिरात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली होती. यानंतर पालिकेने जाहिरात धोरण निश्चित करून जाहिरातींची दरनिश्चिती आणि त्यांच्या जागांची नोंदणी केली होती. त्यानुसार व्यावसायिकांना पालिकेची परवानगी आणि परवाने घेणे भाग होते. काहींनी ते घेतलेही; परंतु काहींनी मात्र ठिकाणे बदलत परवाने घेतलेच नाहीत आणि पालिकेचे उत्पन्न बुडवले. अशा जाहिरात व्यावसायिकांवर पालिका फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे ठरवत आहे.

पालिका अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणी जाहिरात व्यावसायिक जाहिरातींची जागा बदलत असल्याचे दिसत आहे. त्यावर पालिका दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत धोरण ठरविले जात आहे. लवकरच कारवाईचे स्वरूप स्पष्ट केले जाईल. यामुळे शहरातील बेकायदा जाहिरातींना पुन्हा लगाम लागणार आहे.