पहिली मात्रा ५२ टक्के तर दुसरी मात्रा २४ टक्के

वसई : वसई-विरार महापालिकेकडे गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर मुबलक मोफत लशींचा साठा येऊ लागल्याने शहरात सुरू असलेले खासगी सशुल्क लसीकरण बंद झाले आहे. दरम्यान, शहरात  बुधवापर्यंत आठ लाख ६९ हजार १९९ जणांना लशीची पहिली मात्रा मिळाली असून त्याचे प्रमाण ५२.४ टक्के तर  चार लाख ११ हजार ४१५जणांनी दुसरी मात्रा घेतली असून त्याचे प्रमाण २४.७ टक्के  आहे.

जानेवारी महिन्यापासून वसई-विरार शहरात करोना प्रतिबंधक लशी देण्यात येऊ लागल्या होत्या. सुरुवातीला पहिल्या फळीतील आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होत्या. नंतर  ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्वसामान्य नागरिकांसाठी देण्यात येऊ लागल्या. परंतु राज्य शासनाकडून पालिकेला मिळणारा लशींचा साठा पुरेसा येत नसल्यामुळे शहरात मोठी लसटंचाई  झाली होती. करोनाची दुसरी लाट ओसरली नव्हती. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. परिणामी विविध खासगी संस्था आणि पक्षांनी सशुल्क तसेच सवलतीच्या दरात लसीकरण सुरू केले होते. सर्वसामान्य नागरिक लस मिळत नसल्याने हवालदील  होते.     मुबलक लशी मिळू लागल्यानंतर ऑगस्टमध्ये १४ टक्क्यांवर असलेले लसीकरण सप्टेंबर महिन्यात ३४ टक्क्यांवर पोहोचले. लशींचा ओघ सुरू असल्याने ऑक्टोबर मध्यांपर्यंत लसीकरण २३ टक्क्यांनी वाढले. 

पालिकेमार्फत तरुणांचे विशेष लसीकरण

महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लशी देणे आवश्यक आहे. यासाठी पालिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेणार  आहे. पालिकेच्या सर्व केंद्रावर लशी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मीरा-भाईंदरमध्ये पहिली मात्रा ७१ टक्के जणांना

मीरा-भाईंदर महापालिकेतील लसीकरण वेगाने सुरू आहे. शहरात एकूण आठ लाख ५७ हजार १६६ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यात पाच लाख ५६ हजार ७५९ जणांनी लशीची पहिली   तर तीन लाख ४०७ जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. 

‘लस घ्यायला या, सर्वासाठी मोफत लशी’

मुबलक लशी असल्याने पालिकेने लसीकरण केंद्रात वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वी लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडत होती.  आता  आमच्याकडे मोफत लशी आहेत, घेण्यासाठी या असे आवाहन पालिकेला करावे लागत आहे.   त्यामुळे नागरिकांनी मोफत लशी घेण्यासाठी जवळच्या केंद्रात जावे, त्यांना तात्काळ लस मिळेल, असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले आहे. पालिकेकडे मोफत लस सहज मिळत असल्याने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांद्वारे केले जाणारे सशुल्क लसीकरण बंद झाले आहे.