कल्पेश भोईर
वसई: विरारजवळील मारंबळपाडा परिसर आता निसर्ग पर्यटन म्हणून विकसित होऊ लागला आहे. निसर्गपर्यटनासोबतच येथील स्थानिकांनी जिताडा पालन प्रकल्प सुरू केले असून यातून या भागातील रोजगाराला चालना मिळू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांदळवनाचे संवर्धन व यासह स्थानिकांना यातून रोजगार निर्मिती या उद्देशाने विरार येथील मारंबळपाडा परिसर निसर्गपर्यटन म्हणून विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या कांदळवन विभागाच्या कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना या अंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे. विरारचा मारंबळपाडा जेट्टीच्या परिसरात विविध प्रजातीचे कांदळवन आहे. या कांदळवनांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याशिवाय या भागातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले पाहिजे यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये खेकडे पालन, जिताडा पालन, शोभिवंत मासे असे विविध प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

परंतु सध्या या भागात जिताडा पालन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कांदळवन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये गावातील नागरिकांचे जिताडा पालन करण्यासाठी गट तयार करण्यात आले आहेत. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कांदळवन विभाग व प्रतिष्ठान यांच्यामार्फत ९० टक्के अनुदान तर लाभार्थ्यांचे १० टक्के असे मिळून हे प्रकल्प उभारले जात आहेत. आतापर्यंत जिताडा पालनासाठी मारंबळपाडा येथे ६ युनिट उभारण्यात आले आहेत. खाडीच्या क्षेत्रात टाक्यांचे व जाळय़ांचे २४ पिंजरे तयार करून त्यात जिताडा मत्स्य बीज सोडण्यात आले आहेत. अवघ्या काही महिन्यात हे सोडण्यात आलेले मासे ६०० ते ७०० ग्रॅम इतके वजनाचे झाल्यानंतर त्याची बाजारात विक्री केली जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या प्रकल्पामुळे यावर्षी १० लाख ८६ हजार ६६० रुपये इतके उत्त्पन्न मिळाले आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात नागरिकांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी वेळोवेळी कांदळवन विभागाकडून मार्गदर्शन केले जात असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रकल्पाची पद्धत
खाडीत जिताडा पालन प्रकल्प सुरू करताना सर्वेक्षण करून पाण्याची तपासणी केली जाते. त्यात पाण्याची खोली मोजली जाते. भरती ओसरली असली तरी नियमितपणे दहा ते बारा फूट खोल इतके पाणी राहिले पाहिजे. त्यात हे तयार केलेले संरचनात्मक पिंजरे त्याठिकाणी बसविले जातात. व त्यानंतर त्यात मत्स्य बीज सोडून त्यांना खाद्य व इतर देखभाल केली जाते.

मारंबळपाडय़ातील जिताडा पालन गटाला पुरस्कार
जागतिक कांदळवन संवर्धन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान आयोजित कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कारह्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. वसई तालुक्यातील विरार येथील मारंबळपाडा गावातील हरिचंद्र भगत आणि परिवार ह्यांच्या श्री दत्तगुरू जिताडा पालन गटाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. खाऱ्या पाण्यात मत्स्य व्यवसायाची निर्मिती करून रोजगार निर्माण केला आहे. त्यास शासनाचा पुरस्कार मिळाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promotion of employment generation through jitada farming amy
First published on: 05-08-2022 at 00:04 IST