scorecardresearch

गुढीपाडवा शोभायात्रेची जय्यत तयारी

करोना वैश्विक महामारीचे सावट कमी होताच शासनाकडून र्निबध हटविले गेल्याने पुन्हा एकदा उत्सवांचा आनंद मोठय़ा जल्लोषात साजरा केला जात आहे.

विरार : करोना वैश्विक महामारीचे सावट कमी होताच शासनाकडून र्निबध हटविले गेल्याने पुन्हा एकदा उत्सवांचा आनंद मोठय़ा जल्लोषात साजरा केला जात आहे. अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा येऊन ठेपला आहे. याची शहरात मोठी जय्यत तयारी सुरू आहे. शहरात शोभायात्रा काढल्या जाणार आहेत. यासाठी संघटनांनी वेगवेगळे बेत आखले आहेत.
होळी आणि धुळवडीनंतर आता मराठी वर्षांचा पहिला दिवस असलेल्या चैत्र गुढीपाडव्याचे सर्वाना वेध लागले आहे. यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. वसई-विरारमध्ये विविध कार्यक्रमांत या शोभायात्रांना विशेष रंग येणार आहे.
करोना वैश्विक महामारीने शासनाकडून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे मागील दोन वर्षांपासून सर्वच सणांच्या उत्सवांवर बंदी आणली गेली होती. या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने र्निबध शिथिल केल्याने होळीनंतरचा हा मोठा सण असल्याने याचा मोठा उत्साह नागरिकांमध्ये आहे.
विरार येथे विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून दरवर्षी पारंपरिक पेहरावातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणारी शोभायात्रा गाजतवाजत ढोलताशाच्या तालावर काढली जात आहे; पण मागील दोन वर्षांत ही यात्रा बंद होती. यामुळे आता नव्याने ही शोभायात्रा काढली जाणार असल्याचे आयोजक सदस्य हार्दिक राऊत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शासनाने दिलेले करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करूनच यात्रेचा आनंद घेतला जाईल, असेही म्हणाले.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
यासंदर्भात माहिती देताना परिमंडळ ३ ते पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांनी माहिती दिली की, अजूनही शासनाचे कोणतेही निर्णय आले नाहीत. तसेच अजूनही संघटनांनी कोणतीही परवानगी मागितली नाही. यामुळे करोना नियमांचे पालन करून नागरिकांनी उत्सव साजरे करावे, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Proper preparation gudipadva procession processions the government amy

ताज्या बातम्या