भाईंदर : उत्तन येथील ऐतिहासिक ‘जंजिरे धारावी’ किल्ल्याचा विकास करण्याकरिता महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण महासभेत घेण्यात आला.  चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयात ‘जंजिरे धारावी’ किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समुद्रमार्गाने येणारी पोर्तुगीजांची रसद तोडण्यासाठी चिमाजी अप्पांनी या किल्ल्याची बांधणी केली होती. हा टापू जिंकण्यासाठी चिमाजी अप्पांनी आठ वेळा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले ते नवव्या वेळी. ‘एका धारावीमुळे काय हालाहाल झाली, हे ईश्वरास ठाऊक’ असे त्यांनी आईला लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे. उत्तन येथील चौक परिसरात ‘जंजिरे धारावी’ किल्ला आहे. चौक जेटीकडून वर गावाकडे जाताना लागणारा हा किल्ला सध्या गर्द झाडीत दडलेला असल्याने सहजी दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा किल्ला पूर्वी राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे नोंदणीकृत नसल्यामुळे पालिकेकडूनही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. शहरातील गडप्रेमींनी सातत्याने संवर्धन मोहीम राबवल्याने हा किल्ला पुन्हा नावारूपास येऊ लागला आहे. पालिकेकडूनही संवर्धनाच्या कामात सहकार्य मिळत आहे. मंगळवारी पार पडलेल्या महासभेत घोडबंदर किल्ल्यावरील सुशोभीकरणाचा विषय सुरू असताना आगामी काळात पालिकेकडून ‘जंजिरे धारावी’ किल्ल्याचादेखील विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी केली. यावर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी जंजिरे धारावी किल्ल्याच्या पुनर्बाधणीसाठी पावले उचलण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या गडप्रेमींचा सन्मान करण्याचे मत सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी व्यक्त केले. तर किल्ल्याचा विकास करण्याकरिता येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी करणारे लेखी पत्र दिले आहे, असे उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी सांगितले. यावर उत्तर देताना आयुक्त दिलीप ढोले म्हणाले की, ‘जंजिरे धारावी’ किल्ला विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी अर्थसंकल्पात तशी तरतूदही करण्यात येणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provision budget janjire dharavi fort ysh
First published on: 26-01-2022 at 00:25 IST