वसई: वसई- विरार शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून असली तरी अद्याप शहरात पालिकेचे एकही नाटय़गृह नाही. नालासोपारा येथे बांधण्यात येणारे नाटय़गृह मागील ६ वर्षांपासून रखडले आहे. या नाटय़गृहाचे काम अर्धवट असून पालिकेने नव्याने अर्थसंकल्पात नाटय़गृहासाठी निधीची नव्याने तरतूद केली आहे, हे विशेष.
वसई हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मोठय़ा प्रमाणावर शहरात साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम होत असतात. मात्र असे असतानाही पालिकेचे एकही नाटय़गृह नाही. त्यामुळे नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुंबई, ठाण्याला जावे लागत असते. पुर्वी शहरात ४ नगर परिषदा होत्या. त्यामुळे नाटय़गृह बांधता येत नव्हते. या नगर परिषदा मिळून २००९ मध्ये वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी शहरात सुसज्ज नाटय़गृह उभारण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करम्ण्यासाठी सन २०१६-१७ र्वष उजाडले. पालिकेने नालासोपारा पश्चिम येथील छेडा नगरमध्ये नाटय़गृह बनवण्याच्या निविदा काढल्या होत्या. हे काम दोन ठेकेदारांना देण्यात आले होते. बांधकामाचा १५ लाखांचा ठेका एका ठेकेदाराकडे आणि सौंदर्यीकरणाचा ३८ लाखांचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराकडे देण्यात आला होता. हे काम २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप हे काम झालेले नाही. या कामाचा निधी दोन वेळा वाढविण्यात आला होता. ठेकेदाराने विहित मुदतीत काम केले नाही,तर त्याला प्रतिदिन हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी तरतूद करारात करण्यात आली होती. मात्र दंड वसूल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे बांधकाम देखील पूर्ण झालेले नसताना त्यातील एका ठेकेदाराला १० लाखांचे देयक अदा करण्यात आल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ठेकेदारामुळे काम पूर्ण झालेले नसल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमर बेग यांनी केली आहे. मुळात असे नाटय़गृह तयार न होऊ शकणे ही वसईकरांची शोकांतिका आहे. हा पालिकेचा उदासीन कारभार आहे. पण किमान ठेकेदारांवर कारवाई करून हे नाटय़गृह पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सभागृहाच्या कामाचीही प्रतीक्षा
नाटय़गृहाबरोबरच पालिकेने नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर येथील सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. या दोन्ही कामांचा मिळून एकूण खर्च हा ६० लाखांचा होता. ही दोन्ही कामे २०१८ मध्ये पूर्ण व्हायला हवी होती. परंतु अद्याप ती झालेली नाहीत. झालेले काम अपूर्ण असताना पालिकेच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पात नाटय़गृह उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असते. यंदाच्या अर्थसंकल्पातही सांस्कृतिक विभागासाठी ११७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन
नाटय़गृहाचे बांधकाम सुरू असताना ते अधिक प्रशस्त व्हावे यासाठी त्याच्या रचनेत बदल करण्यात आला होता. त्यामुळे विलंब झाला होता, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (बांधकाम) किशोर गवस यांनी दिली. परंतु आता सभागृहाचे बांधकाम तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले.