वसई: पुणे येथे विषारी गावठी मद्याच्या सेवनामुळे घडलेल्या मृत्यूकांडानंतर वसई विरार शहरात अवैध गावठी हातभट्ट्या लावून मद्यनिर्मिती करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.विरार पूर्व येथील बरफपाडा स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात बेकायदेशीरपणे चालवली जाणारी गावठी दारूची हातभट्टी अंमली पदार्थ विरोधी कक्ष-२ च्या पथकाने उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन आणि साहित्य असा एकूण १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
वसई विरार मध्ये जंगल, डोंगर, कांदळवन क्षेत्र अशा विविध ठिकाणच्या भागात गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्ट्या लावण्यात येत आहेत. त्यातून तयार होणारी दारू विविध ठिकाणी वितरित केली जात आहे. दिवसेंदिवस गावठी दारू हातभट्टीचे अड्डे वाढत आहेत.अशा बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांकडून छापे टाकून कारवाई केली जाते.
नुकताच पुणे येथे विषारी मद्य प्राशन केल्याने २० जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वसई विरार शहरातही अशा प्रकारच्या अवैध मद्यनिर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून विविध ठिकाणी कारवाया सुरू केल्या आहेत.
विरार पूर्वेच्या बरफपाडा येथील भागात छुप्या मार्गाने गावठी हातभट्टी लावण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता ॲल्युमिनियमच्या सतेल्याच्या सहाय्याने गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. यात २ हजार लीटर रसायन, ९० लीटर गावठी मद्य व त्यासाठी लागणारे साहित्य असा १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेशही यातून गेला आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
