वसई : वसई, विरार शहरात गटारांची स्वच्छता आता अत्याधुनिक यंत्राद्वारे केली जात आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आणखी सात नवीन सक्शन यंत्रे वाहने खरेदी केली जाणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव तयार करून परिवहन विभागाकडे देण्यात आला आहे.
वसई विरार शहरात पाणी निचरा होण्याच्या गटारात मोठय़ा प्रमाणात गाळ व कचरा जमा होत असतो. या गटारामधील गाळ हा सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छ केला जातो, परंतु यातील सर्वच कचरा हा हाताने काढणे शक्य होत नाही. त्यामुळे गटारे तुंबून जातात आणि त्याची दरुगधी सर्वत्र पसरत असते. तर पावसळ्यातही पाणी निचरा होण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे पूरस्थितीसारख्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. या गटारांची नीटनेटकेपणाने स्वच्छता व्हावी यासाठी मागील वर्षभरापासून अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीनद्वारे गाळ उपसा केला जात आहे. शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता या यंत्रामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करणे गरजेचे आहे. याआधी ६ मशीनद्वारे ही स्वच्छता केली जात होती. आता आणखी सात नवीन जेटिंग मशीन वाहने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे. ही वाहने खरेदी करण्याच्या संदर्भात परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
यात ३ हजार लिटर क्षमतेच्या ३, तर १० हजार लिटर क्षमता असलेल्या ४ व २ पॉवर लोडिंग वाहने अशा वाहनांचा समावेश आहे. यासाठी अंदाजे ३ कोटी ४० लाख रुपये निधी लागणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच हाताने मैला उचलण्यासही शासनाने बंदी घातली आहे. कारण गटारात व टाकीत तयार होणाऱ्या विषारी वायूमुळे याचा परिणाम सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत होता. या यंत्रामुळे गटारांची स्वच्छता ही चांगल्या प्रकारे होऊन कर्मचारी यांचे आरोग्यही सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे.
नाल्यात कचरा टाकणे थांबवायला हवे
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागांत कचरा कचराकुंडीत न टाकता नाल्यात टाकून देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेषत: प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर टाकाऊ कचरा फेकून दिला जात आहे. या प्रकारामुळे नाले तुंबून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी नागरिकांनी नाल्यात कचरा टाकणे थांबवायला हवे, असे आवाहन पालिकेने केले आहे.