भाईंदर : शिवसेना युवा कार्याध्यक्ष तथा मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी मिरा-भाईंदरच्या राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. वडिलांच्या विधानसभा मतदारसंघाला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर ते पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचे नेतृत्व करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात ते शहरातून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ठाणे महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक न लढवता राज्यभरात काम करण्याचा निर्णय घेत पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असून ते राज्यभर दौरे करत आहेत.मागील काही महिन्यांपासून त्यांची ही सक्रियता सुरू असतानाच आता त्यांनी वडिलांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वादातही पूर्वेश सरनाईक यांनी उडी घेत मेहता यांच्यावर टीका केली होती. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलाच रंग चढला होता.
दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धांद्वारे स्थानिक तरुणांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न पूर्वेश सरनाईक यांनी केला. तसेच ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आयोजित बैठकींचे नेतृत्व करतानाही ते वारंवार दिसून येत आहेत.त्यामुळे मिरा-भाईंदरच्या राजकारणापासून आतापर्यंत काहीसे दूर राहिलेले पूर्वेश सरनाईक अचानक सक्रिय झाल्याने भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने काही हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय वारसासाठी तयारी?
पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचे कार्याध्यक्ष असल्याने पक्षाच्या वतीने तरुणांना जोडण्यासाठी ते बैठका घेत असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीही त्यांनी याच मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार प्रताप सरनाईक यांनी सलग चौथ्यांदा निवडणूक लढवून विजय मिळवला.आता मात्र भविष्यात मुलाचे राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी जागा निर्माण केली जात आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
