भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मात्र या इमारतींमध्ये राहत असलेले नागरिक त्यास विरोध करत असल्याने तसेच इमारती मोकळय़ा करण्यास नकार देत असल्याने कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात धोकादायक इमारतींची संख्या कमी आहे मात्र काही जुन्या इमारती आता अगदी पडण्याच्या बेतात आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न सांभाळण्याची जबाबदारी वर्षभरापूर्वीच तत्कालीन पालिका आयुक्त विजय राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून घेतली होती. त्यानंतर ती जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांकडे सोपवली गेली. त्यामुळे शहरातील जुन्या इमारतींच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेण्याच्या सूचना पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ३० वर्षांहून अधिक काळ झालेल्या इमारतींना रचनात्मक तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून सर्व इमारतींना रचनात्मक अहवाल सादर करण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३३२ इमारतीची परिस्थिती चिंताजनक आहे, असे समोर येत आहे. यातील १६ इमारती या अतिधोकादायक स्थितीत आल्या आहेत.

पावसाळय़ात अशा इमारती कोसळून एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी शहरातील सर्व धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामात प्रभाग अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यानंतर घडलेल्या सर्व दुर्घटनेला हे अधिकारीच जबाबदार राहणार असल्याचे पत्रक काढून स्पष्ट केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ५ इमारतींवर प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करण्यात आली आहे. मात्र उर्वरित धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास जाणाऱ्या प्रशासनाला इमारतीतील रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातील अनेक नागरिक इमारत पाडू नये, यासाठी न्यायालयात धाव घेत आहेत. तसेच काही जण पुन्हा इमारत दुरुस्तीची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. असे असले तरीही आत्ता या इमारती मोकळय़ा न केल्यास त्या पडण्याचा धोका आहेच.

धोकादायक इमारतीवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई कायदेशीर पद्धतीने सुरू असल्याने कागदापत्रे तपासून मगच ती केली जाते. — मारुती गायकवाड, उपायुक्त

धोकादायक इमारतींची स्थिती.

’एकूण धोकादायक इमारती    १६

’कारवाई केलेल्या     ०५

’तांत्रिक सल्ला घेण्यासाठी गेलेल्या इमारती    ०३

’मोकळय़ा झालेल्या इमारती   ०२

’न्यायालीन संरक्षण असलेल्या इमारती ०५

’कारवाई प्रलंबित असलेल्या इमारती   ०१