scorecardresearch

रायगड, अलिबागच्या प्रसिध्द पोपटीचे बेत आता वसईत;शहरासह ग्रामीण भागांत पोपटीच्या मेजवाण्या

रायगड जिल्ह्यातील पोपटी हा प्रसिध्द खाद्य प्रकार. मडक्यामध्ये शेंगा आणि चिकन टाकून त्या चुलीवर शिजवून पोपटी बनवली जाते.

रायगड, अलिबागच्या प्रसिध्द पोपटीचे बेत आता वसईत;शहरासह ग्रामीण भागांत पोपटीच्या मेजवाण्या
वसई पूर्वेच्या अनेक भागात वाल, चवळीच्या शेंगा घालून पोपटी तयार केली जात आहे. फोटो- लोकसत्ता

वसई : रायगड आणि अलिबागमध्ये प्रसिध्द असलेली पोपटी आता वसईच्या ग्रामीण भागात देखील बनवली जाऊ लागली आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू असून वसई पूर्वेच्या अनेक भागात वाल, चवळीच्या शेंगा घालून पोपटी तयार केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील पोपटी हा प्रसिध्द खाद्य प्रकार. मडक्यामध्ये शेंगा आणि चिकन टाकून त्या चुलीवर शिजवून पोपटी बनवली जाते. हिवाळय़ात शेंगा बाजारात आल्यानंतर पोपटी बनवली जाते. या शेंगा त्या भागात होत असल्याने अलिबाग, रायगड आणि पनवेल या भागात पोपटी प्रकार मोठय़ा प्रमाणावर तयार केला जातो. त्यामुळे खवय्यांची पावले खास पोपटी खाण्यासाठी तिथे वळायची. वसईत पोपटी नसल्याने खवय्ये नाराज व्हायचे आता वसईच्या ग्रामीण भागातही पोपटी बनू लागली आहे. परंतु पोपटीचा आस्वाद आता वसईमधील खवय्ये देखील घेऊ लागले आहेत. विशेषत: थंडीच्या हंगामात वसईच्या भागात पोपटी बनविल्या जात असून शेतात पोपटी पार्टीचे आयोजन केले जात आहे.

सध्या शेतात व बाजारात वालाच्या, तुरीच्या, चवळीच्या तसेच पावटेवाल आदीच्या शेंगा उपलब्ध होत असल्याने वसईच्या ग्रामीण भागात पोपटी बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून वसईत  खानिवडे, शिरगांव, कोपरी, डोंगरपाडा, कामण यासह आजूबाजूच्या भागात पोपटीच्या पाटर्य़ा रंगू लागल्या आहेत. सध्या थंडीच्या दिवसांत शेकोटीची ऊब घेत पोपटीच्या पाटर्य़ा सुरू झाल्या आहेत. मागील ३ वर्षांत दरवर्षी आम्ही पोपटी बनवतो. मित्र-मंडळीसह गप्पा मारत पोपटीवर ताव मारण्याची मज्जाच निराळी आहे, असे आगाशी येथील आकाश म्हात्रे याने सांगितले. मागील काही वर्षांपासून आम्ही पोपटी पार्टी करत आहोत. त्यासाठी भांबुर्डीचा पाला आणला जातो. वाल, शेंगा वसईच्या शेतात होतात. त्यामुळे अलिबाग, रायगडसारखी पोपटी आम्ही दरवर्षी हिवाळय़ात करतो असे ससूननवघर येथील सुशांत पाटील याने सांगितले.

पोपटी कशी बनते? पोपटी बनविण्यासाठी सर्वप्रथम मडक्यामध्ये मीठ आणि ओव्याचे मिश्रण टाकले जाते. पोपटीमध्ये सर्व प्रकारच्या शेंगा, बटाटा, कांदा, विविध प्रकारच्या भाज्या, वाटण, भांबुडर्य़ाचा पाला एकत्र करून मटक्यात टाकले जातात. त्यात मटण, चिकन, अंडी यांना मसाला, वाटण लावून ते केळीच्या पानात बांधून पोपटीत टाकले जातात व नंतर तयार केलेल्या मडक्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग लावली जाते. साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया केली जाते.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 05:37 IST

संबंधित बातम्या