वसई: वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानकात विविध प्रकारचे गुन्हे घडतात. अनेकदा गुन्हे करून चोर पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्यासाठी परराज्यात धूम ठोकतात. अशा आरोपींचा शोध रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. मागील तीन वर्षांत रेल्वे पोलिसांनी परराज्यात फरार झालेल्या ५८ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मीरारोड ते वैतरणा अशा ७ रेल्वे स्थानकांचा समावेश होतो.  सध्या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. लाखोंच्या संख्येने प्रवासी हे प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे या गर्दीचा गैरफायदा घेऊन विविध प्रकारचे गुन्हेही घडत आहेत. यात पाकीटमारी, सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी, छेडछाडीचे प्रकार अशा घटनांना समावेश आहे. या झालेल्या चोरीच्या व इतर घटनांच्या तक्रारी या पोलीस ठाण्यात येत असतात. चोरी केल्यानंतर त्या आरोपींचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांच्या समोरील एक मोठे आवाहन असते. काही वेळा गुन्हेगार वसईसह विविध ठिकाणच्या स्थानकात चोऱ्या करून परराज्यात पळ काढतात. मागील तीन वर्षांत वसई रेल्वे पोलिसांनी उत्तरप्रदेश, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश अशा विविध प्रकारच्या परराज्यात फरार झालेल्या ५८ आरोपींना पकडून आणले आहे. यात २०१९ मध्ये ३१, २०२०- १६ ,व २०२१ मध्ये ११ अशा प्रकारे आरोपी पकडून आणल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यात काही आरोपी हे परराज्यात पळून जातात. अशा आरोपींचा गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे. मागील तीन वर्षांत जवळपास ५८ आरोपींना आम्ही परराज्यातून पकडून आणले आहे.

सचिन इंगवले, पोलीस निरीक्षक रेल्वे पोलीस ठाणे वसई.