स्थानकांतील गुन्हेगारांबाबत तक्रारी करताना प्रवाशांची धावपळ

वसई : रेल्वे स्थानक परिसर व रेल्वे प्रवासा दरम्यान घडणारे गुन्हे व इतर घटना यावर लक्ष ठेवण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून केले जात आहे. मात्र या पोलिसांना स्थानकात बसण्यासाठी चौक्याच उपलब्ध नाही.

विरार ते वैतरणा ही सात रेल्वे स्थानके  वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येत आहेत. या प्रत्येक स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाप्रमाणेच रेल्वे पोलिसांकडूनही देखरेख व स्थानकात घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. या पोलिसांना बसण्यासाठी प्रत्येक स्थानकात चौकी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र सध्या स्थितीत रेल्वेने केवळ भाईंदर आणि  विरार या दोन स्थानकात चौकी उपलब्ध करून दिली आहे.

सध्या रेल्वे स्थानकातून  लाखोंच्या संख्येने प्रवाशी हे प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे  गर्दीचा गैरफायदा घेऊन  भुरट्या चोरांकडून पाकीट मारी, सोनसाखळी, मोबाइल चोरी यासह काही वेळा हाणामारी, अपघातांच्या घटना असे प्रकार घडतात. त्यांना आळा बसावा यासाठी रेल्वे पोलिसांकडून गस्त घातली जाते.

 चौक्या नसल्याने पोलिसांना सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणेच स्थानकात थांबून राहावे लागते.   चौकी नसल्याने प्रवाशांनाही तक्रार देण्यास अडचणी येतात.  काही वेळा एखादी अपघाताची घटना घडल्यास तसेच अपघातामध्ये मृत्यू झालेला मृतदेह बाहेरच ठेवावे लागत आहे. रात्रीच्या सुमारास अशा अडचणी येतात.  आधीच मनुष्यबळ कमी असल्याने आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घेऊन रेल्वे पोलिसांचे काम सुरू आहे. अशात चौक्यांविनाही अडचणी कायम आहेत.

रेल्वे पोलीस ठाणे स्थानकाजवळच हवे

  वसईचे असलेले  लोहमार्ग पोलीस ठाणे हे रेल्वे कॉलनीच्या इमारतीमध्ये सुरू आहे. मात्र हे सुद्धा कार्यालय वसईच्या रेल्वे स्थानकापासून दूरच्या अंतरावर असल्याने येथे जाण्यास अडचणी येत असतात.

यात केवळ प्रवासी नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांचीही धावपळ होत असते. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने रेल्वे पोलीस ठाणे ही स्थानकाच्या जवळच असावे, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाईंदर आणि विरार या दोन ठिकाणी चौक्या आहेत. इतर स्थानकांत चौक्या मिळाव्यात यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. – सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे- वसई