वसई:- राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात वसई तालुक्यातील नायगाव कोळीवाडा येथे राहणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.चित्तौडगड-बांसवाडा राष्ट्रीय महामार्गावर (एनएच-५६) सोमवारी पहाटे एक ट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर धडक लागून हा अपघात घडला.

भावेश कोळी (२८) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो नायगाव कोळीवाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. भावेश हा व्यावसायिक वाहन चालक म्हणून काम करत होता. एका भाड्याच्या प्रवासासाठी तो दोन प्रवाशांना घेऊन राजस्थानच्या दिशेने गेला होता. मात्र, चित्तौडगड-बांसवाडा राष्ट्रीय महामार्गावरून (एनएच-५६) प्रवास करत असताना, प्रतापगड जिल्ह्यातील सुहागपुरा परिसरात त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली. या अपघातात चालक भावेशसह कारमधील दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान भावेशची प्राणज्योत मालवली.

​भावेशच्या अपघाती निधनाची वार्ता नायगाव कोळीवाड्यात पोहोचताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी सकाळी ८:४५ वाजता नायगाव कोळीवाडा येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात भावेशवर अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

भावेश कोळी यांच्या निधनाची वार्ता नायगाव कोळीवाड्यात पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनामुळे आमच्या गावातील एक होतकरू, मनमिळावू व कष्टाळू तरुण काळाच्या पडद्याआड गेला आहे. भावेशच्या निधनाने आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी झालो आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.–राम कोळी, नायगाव कोळीवाडा ग्रामस्थ