वसई :- विरारमधील राजोडी समुद्रकिनाऱ्यावर नुकतीच राष्ट्रीय स्टँडअप पॅडल चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशभरातील तब्बल १०० स्पर्धक सहभागी झाले होते.
विरार पश्चिमेला राजोडी समुद्र किनारा आहे. नुकतीच या समुद्रकिनारी असणाऱ्या मुंबई सर्फ क्लबमध्ये राष्ट्रीय स्टँडअप पॅडल चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. मुंबई सर्फ फेस्टिवल अंतर्गत आयोजित या स्पर्धेत विविध राज्यातील १०० हून अधिक तज्ञ आणि अनुभवी खेळाडू सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विशाल खत्री, माजी महापौर राजीव पाटील, महाराष्ट्र खो-खो फेडरेशनच्या अध्यक्षा ग्रीष्मा पाटील आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन लेपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई सर्फ क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती रावत यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तर उपजिल्हाधिकारी खत्री आणि राजीव पाटील यांनी हिरवा कंदील दाखवून पहिल्या शर्यतीचा प्रारंभ केला.
उपजिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी मुंबई सर्फ क्लबचे अभिनंदन करत, “अशा विविध प्रकारच्या जलक्रीडा महाराष्ट्रात प्राधान्याने राबवून सागरी पर्यटनास चालना देणे गरजेचे आहे. शासनाकडून वेळोवेळी सहकार्य केले जाईल”, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच “अशा उपक्रमांमुळे सागरी पर्यटनाची विशेष ओळख निर्माण होऊन पर्यटकांचा ओघ वाढेल” असे प्रतिपादन माजी महापौर राजीव पाटील केले. तर, “आम्ही यजमानपदाचा मान योग्य क्लबला दिला,” अशा शब्दांत कॅप्टन लेपांडे यांनी समाधान व्यक्त केले.
सदर राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात शेखर पिचाई यांनी सुवर्ण पदक जिंकले. तसेच १४ वर्षीय आरतीने विविध स्पर्धांमध्ये ३ सुवर्ण पदके प्राप्त करत इतिहास रचला. तर महाराष्ट्रातील मनोज कुंभार, सिद्धि वनमाळी आणि अलिना जोशी यांनी अनुक्रमे सुवर्ण, रजत व कास्य पदक पटकावले.
