भाईंदर : राज्यसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, या उमेदवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिक मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया दिली.ते पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मीरा-भाईंदर मध्ये आले होते.

महाराष्ट्रातून यंदा सात जणांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष स्वतंत्र असला तरी मी भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत जाणार आहे. मागील तीस वर्षांपासून मी ज्या पक्षासोबत राहिलो, त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही एनडीए सोबत असल्यामुळे केंद्रात सत्तेत आहोत.

यंदाही उमेदवारी दिल्याबद्दल मी आभारी असून, भविष्यात सामाजिक न्याय मंत्रीपदाची संधी मिळाल्यास तळागाळातील गरीब व गरजू नागरिकांची सेवा करण्याचे काम असेच करीन, अशी माहिती आठवले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

पक्षाला लवकरच राष्ट्रीय मान्यता
देशात सध्या केवळ चार पक्षांना राष्ट्रीय मान्यता आहे. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, आप आणि बसपा यांचा समावेश आहे. मात्र मागील काही वर्षांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची २८ राज्यांत संघटनात्मक उपस्थिती असून, पक्षाला मिळणाऱ्या मतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे देशातील पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून आमच्या पक्षाला मान्यता मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात सत्तेत समाधानकारक वाटा नाही
देशात आम्ही एनडीएसोबत सत्तेत सहभागी असलो, तरी महाराष्ट्रात आम्हाला सत्तेत समाधानकारक वाटा मिळालेला नाही. येत्या काळात पक्षाला अधिक चांगले स्थान देण्यात यावे, अशी मागणी आम्ही केली असल्याची खंतही आठवले यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.