वसई :- वसई विरार शहरात सातत्याने वाहनांना आगी लागण्याच्या घटना समोर येत आहे. बुधवारी रात्री मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाणपुलावर रेंज रोव्हर कंपनीच्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वाहन जळून खाक झाले आहे.

वसई पूर्वेच्या भागातून भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना समोर येत असतात.

बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नालासोपारा उड्डाण पुलावर एम एच ४३ ए क्यू ७२७२ या रेंज रोव्हर या चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच वसई फाटा उपकेंद्र येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

या आगीत रेंज रोव्हर गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.मालकाच्या सांगण्यानुसार वाहन चालवीत असताना वाहनांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याचे सांगण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा महामार्गावर वाहनांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहन जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाहनाला लागलेल्या आगीमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित झाली होती.

वाहनांची सुरक्षा ही महत्वाची 

वाहनांच्या देखभाल करण्याकडे वाहनचालकांचे करण्याकडे दुर्लक्ष होत असते. यामुळे वाहनात काय तांत्रिक बिघाड आहे हे लक्षात येत नाही. याचा फटका बसून आग लागण्याचे प्रकार घडतात.  याशिवाय काही वाहनात सीएनजी व एलपीजी किट असतात त्याचे मेंटेनन्स  केले करणे महत्वाचे असून अधूनमधून याची वायरिंग व जॉईंट चेक करणं गरजेचं आहे.

परंतु याच्या दुरुस्तीकडे ही लक्ष न दिल्यास शॉर्ट सर्किट व गॅस गळती होऊन आग लागण्याची शक्यता आहे. यासाठी वाहनांची दुरुस्ती व त्याची देखभाल होणे आवश्यक आहे तसेच वाहनांत अग्निशमन करणारा सिलेंडर जर असेल तर जर छोटी आग असेल तर त्याचा भडका होण्याच्या अगोदर आग रोखली जाऊ शकते. व आगीमुळे होणारे नुकसान टळले जाऊ शकेल.