वसई : शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) चे संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू आहे. त्याचा परिणाम हा कामकाजावर होत असून शिधापत्रिका संबंधित प्रकरणे प्रलंबित राहू लागली आहेत. सद्यस्थितीत तीनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहे.
वसई विरार मध्ये नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी परवड होत असते. तर काहीवेळा नागरिकांना शिधापत्रिका मिळविण्यासाठी प्रक्रिया माहिती नसते. अशा वेळी दलालाची मदत घेतात. त्यावेळी त्यांची आर्थिक लुटचे प्रकार समोर आले होते.
या प्रकाराला पायबंद घालावा व कामात पारदर्शकता यावी यासाठी थांबविण्यासाठी यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे. शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे अशी कामे ऑनलाइन करण्यात येत आहेत.
मात्र मागील काही दिवसांपासून ऑनलाइन संकेतस्थळ अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे शिधापत्रिकांची ऑनलाइन होणारी कामे रखडू लागली आहेत. दिवसाला वसईच्या पुरवठा विभागात शिधापत्रिकेच्या संबंधित पन्नासहून अधिक अर्ज येत असतात. मात्र संकेतस्थळ अगदी धीम्या गतीने सुरू असल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. सद्यस्थितीत तीनशेहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत असे पुरवठाविभागाकडून सांगण्यात आले आहे.
नुकताच याबाबत पुरवठा विभागाची वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी बैठक घेतली. त्यात शिधापत्रिका संबंधित अडचणी समजून घेतल्या. ऑनलाइन अडचणी आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ लावून कामे मार्गी लावावी अशा सूचना ही त्यांनी केल्या आहेत. याशिवाय पावसाळ्यात धान्य साठ्याचे नियोजन व वितरण सुरळीत राहील या अनुषंगाने उपाययोजना करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरसीएमएसचे संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू असते. त्यामुळे कामाला गती मिळत नाही आणि शिधापत्रिका प्रलंबित राहतात. याबाबत वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी कळविले आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यास नागरिकांना जलदगतीने शिधापत्रिका देण्यास मदत होईल. – भागवत सोनार, पुरवठा अधिकारी वसई.
रात्री बसून काम करण्याची वेळ
आरसीएमएसचे संकेतस्थळ सर्वच ठिकाणी दिवसभर एकाच वेळी सुरू असल्याने त्यांची गती कमी होते. याशिवाय विविध कागदपत्रे ही अपलोड होत नाहीत. यासाठी आता रात्री बसून ऑनलाइन कामे पूर्ण करावी लागत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे.
नागरिकांची परवड
वसईच्या पुरवठा विभागात शिधा पत्रिकेच्या कामासाठी अर्ज केल्यानंतर विहित वेळेत काम होत नाही. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात त्यांना ही काम न झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे त्याचा वेळ पैसा दोन्ही वाया जात असून परवड ही होऊ लागली आहे.