भाईंदर : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यस्तरीय संघटनात्मक बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता भाजपचे महत्त्वाचे निर्णयही ठाण्यातूनच घेतले जात असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिरा भाईंदर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून ९५ पैकी तब्बल ७८ नगरसेवक पक्षाचे आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत झाल्याने शहराला पक्षामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हास्तरीय बैठकींसाठीही मिरा भाईंदरची निवड केली जात आहे.मंगळवारी मिरा रोड येथील एका खासगी हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्ष शहरात येऊन बैठक घेत असतानाही याबाबतची माहिती अत्यंत मर्यादित कार्यकर्त्यांनाच देण्यात आल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपकडून अशा बैठका घेतल्या जात असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, या बैठकीस राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना तसेच भाजपची विचारधारा आणि लोकाभिमुख कार्यशैली जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, योगेश सागर, माधवी नाईक, प्रवीण दटके, राजेश पांडे, सुनील राणे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
