वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली १७७ कोटी

वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता वसुलीची मोहीम जोरात सुरू असून शुक्रवार, २६ नोव्हेंबपर्यंत पालिकेने १७७ कोटी मालमत्ता वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी तीन रंगांचे आव्हान

वसई: वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता वसुलीची मोहीम जोरात सुरू असून शुक्रवार, २६ नोव्हेंबपर्यंत पालिकेने १७७ कोटी मालमत्ता वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना दैनंदिनी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘तीन रंगांचे आव्हान’ ठेवण्यात आले आहे.

महापालिकेची सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षांच्या मालमत्ता कराची मागणी २८३ कोटी आहे. मागील वर्षांची थकबाकी ३५० कोटी आहे. करोनाच्या काळात पालिकेने २२१ एवढी विक्रमी करवसुली केली होती. यामुळे अधिकाधिक करवसुली करण्यासाठी यंदा महापालिकेने मिशन ३०० कोटी राबविण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता देयकांचे वितरण, मोबाइलवर संदेश-जनजागृती आणि लिलाव कारवाई आदी तीन स्तरांचा त्यात समावेश आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता केवळ १२० दिवस शिल्लक आहे. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांना यश येत  आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले की, या वर्षी विक्रमी मालमत्ता कराची वसुली करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही राहिलेल्या १२० दिवसांसाठी विशेष योजना आखली आहे. यासाठी दैनंदिन वसुली अधिकाधिक व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांना नऊ प्रभागांत विभागून देण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाला ‘तीन रंगांचे आव्हान’ देण्यात आले आहे. दैनंदिन उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जो विभाग ज्या दिवशी जेवढी वसुली करेल त्यानुसार त्याची रंगात विभागणी होईल. उदाहरण एखाद्या विभागाने जास्त वसुली केली तर तो हिरव्या रंगात, साधारण वसुली केली तर पिवळ्या रंगात आणि उद्दिष्ट पूर्ण न करू शकल्यास लाल रंगात विभागणी होते. यामुळे अधिकाधिक वसुलीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन

मालमत्ता कराची वसुली जो विभाग सर्वाधिक करेल तसेच जो कर्मचारी सर्वाधिक वसुली करेल त्याला पुरस्कार देण्याची योजना पालिकेने आखली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन तर मिळेल शिवाय वसुलीचे उद्दिष्टही पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Recovery tax municipal corporation ysh

Next Story
बेशिस्त रिक्षाचालकांमुळे महिलाचालक त्रस्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी