scorecardresearch

भाडेकरार नोंदणी न केल्याने गुन्हेगारांना आश्रय; शहरात बोगस मालमत्ता दलालांचा सुळसुळाट

नालासोपारा येथे एका नक्षलवादी संघटनेच्या सदस्याला अटक झाल्याने अनधिकृत भाडेकरूंचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

भाडेकरार नोंदणी न केल्याने गुन्हेगारांना आश्रय; शहरात बोगस मालमत्ता दलालांचा सुळसुळाट
संग्रहित छायाचित्र

प्रसेनजीत इंगळे

विरार :  नालासोपारा येथे एका नक्षलवादी संघटनेच्या सदस्याला अटक झाल्याने अनधिकृत भाडेकरूंचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदर गुन्हेगार धाणीव बाग येथे एका खोलीत भाडय़ाने राहत होता. या परिसरात केवळ एका कागदी भाडेकरारावर घरे भाडय़ाने दिली जातात. तसेच त्याची पोलीस दप्तरी कोणतीही नोंद केली जात नाही.

वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, त्याचबरोबर येथे राहणाऱ्या गुन्हेगारांची संख्यासुद्धा वाढते आहे. अनेक राज्यांतील कुख्यात गुंड, दरोडेखोर, चोर, नक्षलवादी, खुनी आदी गुन्हेगार शहरात चोरीछुपे राहत आहेत. ऑगस्ट महिन्यात अंमली पदार्थ विरोधी सेलने नालासोपारा हनुमान नगर येथे ७०० किलोचे १४०३ कोटीचे अंमली पदार्थ पकडले होते. या प्रकरणातील आरोपी भाडय़ाने घर घेऊन राहत होते. दाऊद इब्राहिमचा हस्तक अख्तर र्मचट हासुद्धा नालासोपाऱ्यात भाडय़ाने घर घेऊन राहत होता. छोटा राजन टोळीचा सदस्य असेलला अमर बाबुराव वाघ हा यासिन खान या नावाने अनेक वर्ष नालासोपाऱ्यात भाडय़ाच्या घरात राहत होता. त्याच्यावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. छोटा राजन टोळीचा सदस्य चंद्रकांत पाटील १५ वर्षांपासुन नालासोपारा येथे राहत होता. गुजरातमध्ये ५१३ किलो अंमली पदार्थ पकडलेल्या गुन्ह्यातील ३ आरोपीसुद्धा नालासोपारा परिसरात राहत होते.

दहशतवादी यासिन भटकळही २०१२पासून नालासोपाऱ्यात राहत होता. त्याने शहरात बांधकाम व्यवसायही थाटला होता. त्याचबरोबर पुजारी टोळी, उत्तर प्रदेशातील, बिहार, आणि इतर राज्यातील अनेक गुन्हेगार दलालांमार्फत शहरात आश्रय घेत आहेत. सोबतच बांगलादेशी, नायजेरियन नागरिकांचाही मोठा भरणा आहे. या सर्व समाजघटकांकडे अधिकृत कागदपत्रे नसतानाही त्यांना केवळ दलालांमुळे सहज घरे मिळवता येतात.

वसई-विरारला भूमाफिया मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी करत आहेत. त्यात स्वस्तात घरे मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदार अशी घरे विकत घेतात आणि दलालांमार्फत त्यात भाडेकरू ठेवतात. मूळ मालक दुसरीकडेच राहत असल्याने अनेकदा केवळ १०० रुपयाच्या मुद्रांकावर व्यवहार केले जातात. याची पोलीस दप्तरी कोणतीही नोंद केली जात नाही.

बहुतांश दलाल स्थानिक पोलीस ठाण्यात भाडे कराराची नोंद  करत नाहीत, असे वसई विरार इस्टेट कंन्सल्टंट संस्थेचे उपाध्यक्ष वकील दिनेश आदमाने यांनी सांगितले. आदमाने यांची संस्था मागील १५ वर्षांहून अधिक काळापासून इस्टेट एजंट नोंदणी करत आहे.  आदमाने पुढे म्हणाले की, मागील काही वर्षांत २ हजारांहून जास्त बोगस दलाल निर्माण झाले आहेत. पैशाच्या मोबदल्यात गैरधंदे करणाऱ्यांना ते घरे मिळवून देतात. पोलिसांनी अशा दलालांवर कारवाई करावी.

भाडेकरार नोंदणी गांभीर्याने घेणार

अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे विजयकांत सागर यांनी सांगितले की, पोलिसांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेतली आहेत. लवकरच अशा ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन्स होणार आहेत. भाडेकरूंच्या बाबतीतही पोलीस कारवाई करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली मालमत्ता भाडेकराराने देताना पोलीस नोंदणी करुनच व्यवहार करावे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Refuge non registration tenancy bogus property brokers rampant city ysh