तीन दिवस कोंडीचे संकट; वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे हलक्या वाहनांसाठी एकच मार्गिका खुली

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा विविध विभागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज येथून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ होत असते.

वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे हलक्या वाहनांसाठी एकच मार्गिका खुली, अवजड वाहनांना बंदी

वसई: भाईंदर खाडीवरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम  १३ ते १५ नोव्हेंबर या तीन दिवसात केले जाणार आहे. त्यामुळे हलक्या वाहनांना ये-जा करण्यासाठी  एकच मार्गिका खुली ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता  मुंबई व ठाण्यातून गुजरातच्या दिशेने प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना पुलावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा विविध विभागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज येथून मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ होत असते. याच मार्गावरील भाईंदर खाडीवर वर्सोवा पूल तयार करण्यात आला आहे. पूल  जुना असल्याने  आयआरबी यांच्यामार्फत १३ ते १५ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच्या दुरुस्तीचे काम केले  जाणार आहे.  सलग तीन दिवस पुलाची एक मार्गिका  बंद ठेवून केवळ एकच मार्गिकेचा वापर सुरू राहणार आहे.  ठाणे व मुंबईच्या बाजूने पालघर-गुजरात बाजूकडे जाणारी अवजड व हलकी वाहने एकाच वेळी एकाच मार्गिकेवरून सोडल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी ठाणे व मुंबई येथून पालघर – गुजरातच्या दिशेने जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.  या वाहनांची वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन

वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे एक मार्ग बंद राहणार असल्याने केवळ एकच मार्गिका खुली राहणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मीरा भाईंदर व वसई विरार विभागातील वाहतूक पोलिसांनी गुरुवारी  महामार्गाची व पर्यायी मार्गाची पाहणी करून त्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

वर्सोवा पूलावरील वाहतूक बंद असल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक व आत्यंतिक निकडीशिवाय याभागातील प्रवास टाळावा तसेच पर्यटकांनी आपल्या वेळेच्या दृष्टीने प्रवास टाळावा.पुलाच्या दुरुस्तीचे काम अतिशय आवश्यक असल्याने वाहतूक पोलीस व इतर कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन ही पोलिसांनी प्रवाशांना केले आहे.

पर्यायी मार्ग

ठाणे शहर हद्दीतून वर्सोवा मार्गे पालघर बाजूकडे येणारी जड-अवजड वाहने.

मुंब्रा – खारेगाव टोलनाका -मानकोली – अंजूरफाटा- खारबाव- कामण चिंचोटी मार्गे इच्छुक स्थळी जाण्याचा पर्यायी मार्ग

मुंब्रा-खारेगाव टोलनाका -मानकोली-वडपे- नदीनाका- भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा- मनोर मार्गे

मुंब्रा-खारेगाव टोलनाका- मानकोली-वडपे- नदी नाका-  वर्जेश्वरी गणेशपूरी- शिरसाट फाटा मार्गे जाण्याचा पर्यायी मार्ग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Repairs to the versova bridge opened up a single lane for light vehicles akp

ताज्या बातम्या