scorecardresearch

पालिकेच्या मालकीच्या वाहनांचे अहवाल गायब; जुनाट वाहनांमुळे खर्चात वाढ

वसई विरार महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध विभागातील वाहनांची कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विरार : वसई विरार महानगरपालिकेच्या मालकीच्या विविध विभागातील वाहनांची कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिकेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या असून या वाहनांच्या कागदपत्रांची प्रत मिळण्याची मागणी परिवहन विभागाला केली आहे.
वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापनेपासून विविध कामांसाठी अनेक वाहने खरेदी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिकेच्या विविध विभागांत जवळपास २५० वाहने पालिकेच्या मालकीची आहेत. पालिकेच्या मालकीच्या वाहनांची परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर पाहणी केली असता त्यांचे कोणतेही अहवाल उपलब्ध न झाल्याने त्याची मागणी पालिकेकडे केली असता, सदर प्रकार उघडकीस आला. आता अचानक जाग आल्यानंतर पालिकेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवून परिवहन विभागाकडे या वाहनांच्या कागदपत्रांची मागणी केली.
पालिकेच्या विविध विभागांतील कार्यरत वाहनांची वैधता संपली आहे. तरीही ती बिनदिक्कत वापरली जात आहेत. यातील काही वाहने ठेक्यावर वापरात आहेत. त्यातील अनेकांची पीयूसी क्षमता आणि वैधता चाचणी केलीच जात नाही. ही पर्यावरणविरोधी वाहने प्रत्यक्ष पालिकेकडूनच रस्त्यावर धावत आहेत. असे करणे गैर असताना, हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पालिका या वाहनांची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगत पळवाटा शोधत आहे, असा आरोप केला जात आहे.
पालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि दिवाबत्ती विभागात अशी भंगार वाहने वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर पाहणी केली असता, या वाहनांची कोणतीही कागदपत्रे, अहवाल सापडले नाहीत. ज्यांचे अहवाल सापडले त्यात पालिकेने कोणत्याही चाचण्या केल्याचा उल्लेख नाही. या भंगार वाहनांमुळे पालिकेच्या दुरुस्ती खर्चात वाढ झाली आहे. पालिकेने या वर्षीच्या अर्थसंकल्पात वाहने दुरुस्तीचा निधी वाढवून ६ कोटी रुपयापर्यंत नेला आहे. २०१२ पूर्वी खरेदी केलेल्या या वाहनांविषयी परिवहन विभागही काणाडोळा करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमएच ४८ जे-८७, एमएच ४८ जेझ्र्७४८ ही वाहने पालिकेच्या कचरा व्यवस्थापनात आहेत. तर एमएच ४८ ई-१४६ हे वाहन दिवाबत्ती विभागात कार्यरत आहे. या तीनही वाहनांची वैधता संपली असूनही ती चालवली जात आहेत. समाजसेवक महेश कदम यांनी परिवहन विभागाला पत्र देऊन अशा भंगार वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर वाहने ही आधीच खरेदी केली आहेत, त्यांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून. नवीन कागदपत्रांची मागणी परिवहन विभागाला केली आहे.-मनाली शिंदे, प्रभारी सहायक आयुक्त- परिवहन विभाग महानगरपालिका

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reports vehicles owned municipality disappear vehicles increase costs vasai virar municipal corporation amy

ताज्या बातम्या