वसई: सोमवारी सायंकाळी नवीन वर्सोवा पुलाची मुंबईहून पालघर-गुजरातला जाणारी एक मार्गिका खुली करण्यात आली. मार्गिका खुली झाल्याने महामार्गावरील मुंबई, काशीमिरा भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा मुंबई, ठाणे, वसईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. दररोज या महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर वर्सोवा खाडी पूल आहे. वाहनांची वाढती संख्या व जुन्या वर्सोवा पुलाची होत असलेली दुरवस्था या गोष्टी लक्षात घेऊन जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे.
या पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मुंबईच्या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता. नव्या वर्सोवा पुलाची मुंबई आणि ठाण्यावरून सुरतच्या दिशेने जाणारी एक मार्गिका सोमवारी सायंकाळी सुरू करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात ट्विटकरून पुल सुरू झाल्याची घोषणा केली होती. एक मार्गिका सुरू झाल्याने मुंबईवरून पालघर गुजरातच्या दिशेने जाताना घोडबंदर पूल ते दहिसर टोलनाक्या पर्यँत लागणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली होण्याची प्रतीक्षा
पालघर, वसई विरार यासह गुजरात येथून दररोज मोठय़ा संख्येने वाहने मुंबईच्या दिशेने विविध कामानिमित्त प्रवास करतात. अजूनही नवीन पुलावरील मार्गिकेचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहनांची जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर पुलापासून ते ससूनवघरपर्यँत कधी कधी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते याचा फटका वाहनचालकांना बसतो.
याशिवाय आजूबाजूच्या लगत असलेल्या गावातील नागरिकांच्या दैनंदिन दळणवळण वरही याचा परिणाम होत असतो असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. ती मार्गिका ही लवकर खुली व्हावी यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.