भाईंदर :-मिरा रोड येथे नागरी वस्तीत उभ्या केल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या वाहनांच्या धुलाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना या वाहनांतून निघणाऱ्या दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
भाईंदर पश्चिम येथील उत्तनच्या धावगी डोंगरावर महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारला आहे. शहरातून दररोज सुमारे ५५० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा प्रकल्पस्थळी नेण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारामार्फत सुमारे १२७ वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार ही वाहने कचऱ्याची वाहतूक करत आहेत. मात्र या वाहनांच्या वाहनतळाचा प्रश्न प्रशासनासमोर गंभीर स्वरूपात उभा आहे.
यातील काही वाहने भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र भोस मैदानाजवळ उभी केली जातात, तर काही वाहने रामदेव पार्क येथील मोकळ्या भूखंडावर उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे वाहनाला कचरा चिकटून बसतो.परिणामी या वाहनांमधून दुर्गंधी पसरत असून स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ही वाहने प्रामुख्याने नागरी वस्तीत उभी असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे दुर्गंधीची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे ही वाहने येथून हटवावीत किंवा त्यांची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहनांची धुलाई केली जात नसल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आदेशाकडे दुर्लक्ष
महापालिकेने कंत्राटदारासोबत केलेल्या करारानुसार कचऱ्याच्या वाहनांची नियमित धुलाई करणे बंधनकारक आहे. वाहनतळ उपलब्ध करून देताना आवश्यक सुविधा उभारण्याची अटही घालण्यात आली होती. सुरुवातीला काही दिवस कंत्राटदाराकडून वाहनांची धुलाई करण्यात येत असल्याचे दिसून आले; मात्र सध्या याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सर्व्हिस सेंटरचे कामही रखडले
कचऱ्याची वाहने धुण्यासाठी तसेच त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी भाईंदरच्या आझाद नगर भागात ‘सर्व्हिस सेंटर’ उभारण्यासाठी महापालिकेकडून कंत्राटदाराला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र दरम्यान आयुक्तांची बदली होऊन नवे आयुक्त रुजू झाल्याने हे काम रखडल्याचे समोर आले आहे.

