Naigaon rickshaw strike : वसई : नायगाव बापाणे मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याची फारच बिकट अवस्था झाली आहे. संतप्त झालेल्या नायगाव पूर्वेच्या रिक्षाचालकांनी मंगळवारी सकाळपासूनच रिक्षा बंद आंदोलन केले. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांचे रिक्षा अभावी हाल झाले.

नायगाव पूर्वेच्या भागातून नायगाव बापाणे असा महामार्गाला जोडणारा ५.२ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते.परंतु या रस्त्याची देखभाल दुरुस्ती योग्य रित्या केली जात नसल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयातून प्रवास करताना रिक्षाचालक यांच्यासह वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या भागात ७५० स्थानिक रिक्षा चालकांच्या रिक्षा असून पहाटे तीन वाजल्यापासून ते रात्री अडीच वाजेपर्यंत प्रवाशांना सेवा दिली जाते.

हेही वाचा…Minor Girl Commits Suicide : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची आत्महत्या; दोघांविरोधात गुन्हे दाखल

मात्र खड्ड्यांमुळे रिक्षा चालविताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या याशिवाय अपघाताच्या घटना वाहनांचे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त झालेल्या रिक्षाचालक मालक संघटनेने मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच रिक्षा बंद आंदोलन केले. त्यानंतर दहा वाजता जूचंद्र येथील नाक्यावर रिक्षाचालक, ग्रामस्थ विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास आंदोलकांनी रस्ता रोखून धरला होता. जो पर्यंत रस्त्याचे नूतनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार असा पवित्रा येथील आंदोलकांनी घेतला होता.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी महापालिका अधिकारी व आंदोलक यांची चर्चा घडवून आणली. महापालिकेच्या प्रभाग समिती जी च्या सहाय्यक प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे व बांधकाम विभागाचे उपाभियंता सुरेश शिंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची काम पूर्ण केली जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा…Virar Resort : विरार नवापूर येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर कारवाई

प्रवाशांचे हाल

रिक्षा चालकांनी पुकारलेल्या रिक्षा बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना अडीच ते तीन किलोमीटर नायगाव स्थानकापर्यंत पायी प्रवास करावा लागला तर दुसरीकडे महापालिकेची केवळ एकच बस उपलब्ध असल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसला. या आंदोलनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून काही शाळांनी मुलांना सुट्टी दिली होती.