वसई:- राज्यात एका पाठोपाठ एक अशी भोंदू बाबांचे कारनामे उघड होऊ लागले आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच वसईतून ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याने पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य हा फरार झाला होता. मात्र पुणे पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा ऋषिकेश वैद्य नेमका आहे तरी कोण असा प्रश्न ही उपस्थित केले जात आहे.

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य कोण आहे ?

ऋषिकेश वैद्य हा वसई पश्चिमेच्या स्टेला परिसरात राहत असून तो स्वयंघोषित धर्मगुरू आहे. याशिवाय आमची वसई या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.आमची वसई संस्थेच्या नावाने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजना मध्ये वसई विरार शहरात सक्रिय होता. अध्यात्मिक प्रवचने याद्वारे समाजातील अनेक तरुण -तरुणी व महिलांना आकर्षित केले होते. विशेषतः सोशल मीडियावर अध्यात्मिक व धार्मिक मजकूर टाकून तो लोकांच्या संपर्कात राहत होता. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून २०२३ मध्ये एका पुण्याच्या महिलेशी ओळख झाली होती. अध्यात्म शिकवण्याच्या नावाखाली त्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महादेवाचा अवतार सांगत केला अत्याचार

डिसेंबर २०२३ मध्ये त्या महिलेला भेटायला ऋषिकेश वैद्य हा पुण्यात गेला होता. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस असे सांगून तिला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न केला.

होता. सद्यस्थितीत नाशिकच्या भोंदू अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर या महिलेने हिंमत दाखवून स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो पुणे पोलिसांकडे वर्ग केला. गुन्हा दाखल होताच वैद्य हा वसई विरार शहर सोडून फरार झाला होता. शुक्रवारी रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड मधून अटक केली.

८ वर्षांपूर्वी ऋषिकेश वैद्यच्या भोंदूगिरीबद्दल पोस्ट

२०२६ या वर्षात जरी वसईतील ऋषिकेश वैद्य हे प्रकरण चर्चेत आले असले, तरी नालासोपाऱ्यातील भूपेश पाटील यांनी २०१८ साली याबाबत पोस्ट टाकत या कथित धर्मगुरू हा भोंदू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना भूपेश राऊत म्हणाले की, २०१८ साली या भोंदू बाबाने एका मुलावर अत्याचार केले होते. आम्ही तक्रार करण्यासाठी देखील पोलीस ठाण्यात जाणार होतो. मात्र, घरच्यांच्या सांगण्यावरून आणि बदनामीच्या भीतीने त्या मुलांनी तक्रार करणे टाळले. पण, आम्ही २०१८ पासून हा धर्मगुरू खोटा आहे. हा शंकराचार्यांचा शिष्य नसून लोकांकडून फक्त पैसे उकळण्याचे काम करत आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांना दिली.