कामण-भिवंडी रस्त्यासाठी रास्ता रोको

चिंचोटी- भिवंडी राज्य महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत.

वसई: चिंचोटी- भिवंडी राज्य महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ामुळे मागील काही दिवसांपासून अधूनमधून अपघात होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असे असतानाही शासनाकडून या रस्त्याची दखल घेतली जात नसल्याने बुधवारी सकाळी कामण ते भिवंडी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वसई पूर्वेतील भागातून चिंचोटी ते माणकोली (भिवंडी )  असा २३ किलोमीटरचा राज्य महामार्ग गेला आहे. या मार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांनी वर्दळ होत असते. मात्र सध्या स्थितीत या महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाल्याने येथून ये-जा करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणच्या भागात दीड ते दोन फूट खोल अशा स्वरूपाचे  खड्डे पडले आहेत.  नुकताच या मार्गावर एका युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  सामाजिक संस्था, महिला मंडळं, रिक्षा-टेम्पो युनियन, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, प्रवासी व वाहतूकदार यांच्या माध्यमातून कामण-भिवंडी रस्त्यावरील कामण नाका, खारबांव, कालवार आणि अंजुरफाटा अशा चार ठिकाणी  रास्तारोको आंदोलन करण्यात आले.   ग्रामस्थांनी राज्य महामार्ग रोखून धरला होता यामुळे जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मागील काही वर्षांपासून आम्ही सर्व गावकरी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्याकडे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करीत आहोत परंतु प्रशासनाचे याकडे होत आहे, असे आंदोलनकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा येथील स्थानिकांनी घेतला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार यांच्या आश्वासना नंतर काही तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

  • रस्त्यावर खड्डय़ामुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबाला १० लाख रुपये तसेच अपघातात अपंगत्व आलेल्या ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी
  • नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
  • जो पर्यंत रस्त्याची योग्य दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करा
  • सुप्रीम कंपनीने या आधी आंदोलन कर्त्यांवर करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे
  • प्रशासन व ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघाताच्या घटना घडल्या असून त्याची चौकशी करून  गुन्हे दाखल करा.

आंदोलनाच्या धसक्याने रस्ते दुरुस्तीला सुरुवात

खड्डय़ांमुळे या चिंचोटी कामण — भिवंडी महामार्गावर अपघाताच्या घटना वाढीस लागल्या होत्या यामुळे या महामार्गलगत असलेल्या जवळपास २५ ते गावातील नागरिकांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. या आंदोलनाच्या धसक्याने अखेर प्रशासनाला जाग आली असून विविध ठिकाणच्या भागात तात्पुरता स्वरूपात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून त्यात दगड, माती व ग्रीट पावडर व पेव्हर ब्लॉक याच्या साहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले असल्याचे चित्र  पाहायला मिळाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Road block for kaman bhiwandi road vasai ssh

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?