लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : पावसाळा सुरू होताच यंदाही महामार्गावर समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. वसई पूर्वेच्या ससूनवघर- मालजीपाडा जवळ नाले टाकण्याचे काम सुरू आहे. याच दरम्यान रविवारी सकाळी पावसाळा सुरवात होताच रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याने अवजड वाहने यात अडकून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सद्यस्थितीत काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. पावसाळा सुरू होण्या आधी उपाययोजना करा अशा सूचना प्राधिकरणाला केल्या होत्या. मात्र त्यानंतर ही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाऊस सुरू होताच एकापाठोपाठ एक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा-वसई: दहा मिनिटांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट, वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरण्याचे काम

रविवारी सकाळी पाच वाजता  ससूनवघर व मालजीपाडा या दरम्यान नाल्यातील पाईप टाकण्याचे काम सुरू असताना खोदकाम केलेला रस्ता खचून गेला आहे. रस्ता खचल्याने यात अवजड वाहनांच्या गाड्यांची चाकं त्यात अडकली. त्यामुळे नायगाव व भाईंदर या दरम्यान वाहतूक सेवा ठप्प होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

अडकलेली वाहने क्रेन मदतीने काढून त्यात खचलेल्या रस्त्याची तात्पुरता दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्राधिकरण व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत सुरू आहे. सलग पावसाळा सुरवात होताच दुसरा दिवस ही कोंडीचा गेल्याने नागरिकांनी गलथान कारभारा विषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा-दुबईत नोकरीच्या आमिषाने तरूणीची फसवणूक;भरोसा कक्षाने केली सुखरूप सुटका

तीन तास कोंडीत

रस्ता खचल्याच्या समस्येमुळे गुजरात वाहिनीवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. जवळपास तीन ते चार तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असल्याचे प्रवाशांनी सांगितले. सातत्याने अशा समस्या येत आहेत त्यासाठी प्राधिकरण व सरकार यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचा आरोप ही नागरिकांनी केला आहे.