अवकाळी पावसात वाहुतकीवर परिणाम

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी विविध ठिकाणी नाले तयार करण्यात आले आहेत. मात्र या नाल्यावर अतिक्रमण व नाल्यात कचरा टाकून दिला जात असल्याने नाले तुंबून गेले आहेत. त्यामुळे पाणी जाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

वसई पूर्वेकडच्या भागातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. घोडबंदर पुलापासून ते खराटतारापर्यंत वसई-विरारची हद्द आहे. या हद्दीत पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठीचे नैसर्गिक नाले आहेत. मात्र या नाल्यावर व नाल्याच्या समोरच अतिक्रमण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी माती भराव टाकून नाले बुजविले आहेत तर काही ठिकाणी थेट नाल्यातच कचरा टाकून दिला जात असल्याचे प्रकार समोर येऊ  लागले आहेत. या प्रकारामुळे पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून पावसाळ्यात महामार्गावरील विविध ठिकाणच्या भागात पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊ  लागला आहे. या प्रकाराकडे आयआरबी, महामार्ग प्राधिकरण, तहसील विभाग, महापालिका यांचे दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसातही मालजीपाडा परिसरात पावसाचे पाणी साचून याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

पावसाळ्याआधी पाणी जाण्याचे मार्ग मोकळे

  • पावसाळ्यात महामार्ग पाण्याखाली जात असल्याने खा. राजेंद्र गावित यांनी आयआरबी, महामार्ग प्राधिकरण, महापालिका, वाहतूक, तहसील अशा सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकताच पाहणी दौरा केला होता.
  • यावेळी वसरेवा पूल ते वसई या दरम्यान अनेक ठिकाणी नाले तुंबलेल्या स्थितीत असल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी आगामी पावसाळ्याआधीच या नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण, बुजविलेले नाले स्वच्छ करून पाणी जाण्याचे मार्ग मोकळे केले जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच ज्या ठिकाणी नाले टाकणे, कल्व्हर्ट दुरुस्ती-बांधणी अशी कामे ही पूर्ण केली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.