scorecardresearch

शासकीय कार्यालयांना पत्र्यांचे छप्पर; पावसाळय़ातील गळतीपासून कर्मचाऱ्यासह नागरिकांची सुटका

गेल्या अनेक वर्षांपासून वसईच्या भागातील शासकीय कार्यालये व आस्थापना यांची दुरवस्था झाली आहे.

वसई: गेल्या अनेक वर्षांपासून वसईच्या भागातील शासकीय कार्यालये व आस्थापना यांची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी पावसाळय़ात कार्यालयांना गळती लागल्यामुळे त्यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत होता. अखेर कार्यालयावरील ताडपत्री काढून पत्र्याचे छप्पर उभारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना गळतीच्या त्रासातून सुटका झाली आहे.
वसईत विविध शासकीय कामांच्या कामकाजासाठी शासकीय कार्यालये उभारण्यात आली आहे. परंतु शहरातील महत्त्वाची कार्यालये ही अखेरच्या घटका मोजत आहे. शासनाने कामकाज करण्यासाठी कार्यालये उभारली परंतु त्यांची वेळीच डागडुजी न केल्याने ही बिकट अवस्था बनू लागली होती.
वसईत प्रांताधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यलय, भूमिअभिलेख, तलाठी अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. या कार्यालयातून विविध विभागांची शासकीय कामे चालतात याशिवाय महत्त्वाचे दस्तऐवज व कागदपत्रेही या कार्यालयात असतात. ही कार्यालये अनेक वर्षे जुनी असल्याने अनेक कार्यालयांच्या पावसाळय़ात छताला गळती लागत असे. या गळतीमुळे महत्त्वाचे कागदपत्रे व दस्तऐवज भिजून जाण्याची शक्यता होती.
त्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात या कार्यालयांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत होता. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळय़ा आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कार्यालयावरील ताडपत्री काढून त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्यांचे शेड उभारण्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
न्यायालयाला आद्यपही ताडपत्रीचा आधार
वसईत दिवाणी स्तर कनिष्ठ, दिवाणी स्तर वरिष्ठ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तसेच जिल्हा व सत्र न्यायालय आहे. वसई तहसीलदार कार्यालयाशेजारी असलेली ही चार न्यायालये केवळ २० गुंठे एवढय़ा कमी जागेत दाटीवाटीने वसलेली आहेत. ही न्यायालय अनेक वर्षे जुने झाल्याने या न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार होती. परंतु दोन वर्षे उलटून त्यासाठी लागणारी जागा ही हस्तांतरण न झाल्याने त्याचे काम रखडले आहे. सद्यस्थितीत हे न्यायालय ताडपत्रीच्या आधारावर असल्याचे चित्र आहे.
वसईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या कार्यालयावर ताडपत्री होत्या त्या हटवून आता त्या ठिकाणी पत्र्यांचे शेड उभे करण्यात आले आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार डागडुजी करण्यात आली आहे. – प्रशांत ठाकरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Roofing sheets government offices citizens along staff rescued rain spill amy

ताज्या बातम्या