वसई-विरारमध्ये रिक्षा बेसुमार ; पावणेतीन वर्षांत साडेतेरा हजार परवान्यांचे वाटप; सहा हजार नवीन रिक्षा

वसई-विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्याही भरमसाट झाली आहे.

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : मागील काही वर्षांपूर्वी  रिक्षा परवाने खुले करण्यात आले आहेत. परवाने खुले होताच परवाने काढून घेण्यासाठी रिक्षाचालकांचा कल वाढला आहे. पावणेतीन वर्षांच्या कालावधीत वसई-विरार शहरात साडेतेरा हजार परवाने परिवहन विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात दिवसागणिक नवीन रिक्षांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

वसई-विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्याही भरमसाट झाली आहे. या वाढत्या वाहनांचा परिणाम हा शहरातील रस्त्यावर दिसू लागला आहे. सुरुवातीला राज्य परिवहन विभागाने रिक्षांचे परवाने बंद केले होते. त्यामुळे काही मोजक्याच परवानाधारक असलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. परंतु परवाना मिळत नसल्यामुळे काही रिक्षाचालक नाइलाजाने बेकायदा रिक्षा चालवत होते. राज्य परिवहन विभागाकडून परवाने खुले होताच शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात २०१९ ते सप्टेंबर २०२१ या पावणेतीन वर्षांच्या कालावधीमध्ये १३ हजार  ५३२ इतके  रिक्षा परवाने देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.करोनाकाळात थोडे काम थंड होते. त्या कामाला ही गती दिली जात आहे.  मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या अडीच वर्षांच्या दरम्यान ६ हजार २९६ इतक्या नवीन रिक्षांची नोंदणी करण्यात आली आहे.

शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी यासारखी समस्याही निर्माण झाली आहे. तसेच अधिकृत रिक्षाथांबे नसल्याने मिळेल त्या ठिकाणी आता रिक्षा उभ्या केल्या जाऊ लागल्या आहेत. अधिकृत रिक्षाथांब्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

बेशिस्त रिक्षाचालकांमुळे अडथळे

वसई-विरार शहरात रिक्षांची संख्या बेसुमार वाढली आहे. शहरातील रस्ते आधीच अपुरे आहेत. त्यातच काही रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा उलट-सुलट पद्धतीने उभ्या करतात. तर काही ठिकाणी ये-जा करण्याच्या मार्गातच रिक्षा थांबवून प्रवाशांना बसविणे व उतरविणे असे प्रकार केले जातात. यामुळे मागून आलेल्या इतर प्रवासी नागरिकांचा यामुळे खोळंबा होतो. जास्तकरून वसई, विरार, नायगाव, नालासोपारा अशा भागांतील स्टेशनजवळच्या भागात असे प्रकार घडतात. यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते.

रिक्षा परवाने खुले झाल्यानंतर परिवहन विभागात परवाने काढणे व नवीन रिक्षा नोंदणीसाठीची अधिक प्रकरणे येत आहेत. यावरूनच शहरात रिक्षांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

प्रवीण बागडे, साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारीवसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rto issue 13500 auto rickshaw permit in vasai virar city zws

Next Story
रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती
ताज्या बातम्या