वसई: पिंपरी-चिंचवड, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन’ (IBBFF) राष्ट्रीय स्पर्धेत वसई तालुक्यातील कळंब गावचा सुपुत्र ऋषिकेश संजय मेहेर याने अष्टपैलू कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या मान्यतेने २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत देशभरातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ऋषिकेशने आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर यश संपादन केले.

यामध्ये ज्युनिअर नॅशनल क्लासिक फिजीक मध्ये प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक), ज्युनिअर नॅशनल मेन्स फिजीक मध्ये प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) व ज्युनिअर नॅशनल बॉडी बिल्डिंग मध्ये तृतीय क्रमांक (कांस्य पदक) पटकावला. ऋषिकेशला खेळाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्याचे वडील संजय मनोहर मेहेर हे स्वतः राष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठवपटू राहिले आहेत.

त्यांनी ‘वसई श्री’, ‘ठाणे श्री’ यांसारखे अनेक किताब जिंकले असून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ऋषिकेशने मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे मेहेर कुटुंबासह संपूर्ण कळंब गावात आनंदाचे वातावरण आहे. एकाच स्पर्धेत तीन पदके जिंकून ऋषिकेशने केवळ वसई तालुक्याचेच नव्हे,

तर संपूर्ण महाराष्ट्रातील मच्छिमार समाजाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल पालघर जिल्ह्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ऋषिकेशचे स्वप्न आहे.