वसई:सहा वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सिनेविश्वात खळबळ उडाली होती. तर त्यानंतर १४ जून २०२६ रोजी अभिनेत्री संचिता उगले हिने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संचिताचा चुलत भाऊ आकाश सतीश उगले याने सोशल मीडियावरील एका संशयास्पद इन्स्टाग्राम आयडीचा दाखला देत गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे केली आहे.
मालिका विश्वावातील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने रविवारी सायंकाळी नालासोपारा येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना संचिताच्या चुलत भावाने धक्कादायक खुलासे केले आहेत.
संचिताच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असताना, तिच्या भावाला इन्स्टाग्रामवर एक संशयास्पद आयडी आढळून आला. edit_.by_.riyu नावाच्या या आयडीवर संचिताचाच प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संचिताने आत्महत्या केली त्याच दिवशी (१४ जून) या आयडीवरून एक रील पोस्ट करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.
या रीलमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या क्लिप्स वापरण्यात आल्या असून त्यावर ‘इट्स अगेन १४ जून’ असे लिहिण्यात आले असून वी मिस यु सुशांत सर असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. या आयडीवरील सर्वात शेवटची पोस्ट २ जून २०२६ ची असल्याने, हा आयडी अगदी अलीकडेच तयार करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तसेच माझी बहीण खूप घाबरली होती.
सहा वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सिनेविश्वात खळबळ उडाली होती. तर त्यानंतर १४ जून २०२६ रोजी अभिनेत्री संचिता उगले हिने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संचिताचा चुलत भाऊ आकाश सतीश उगले याने सोशल… pic.twitter.com/CIi1wKm9OT
— LoksattaLive (@LoksattaLive) June 15, 2026
या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड दबाव आणला जातो, धमक्या दिल्या जातात. जसं सुशांत सिंह राजपूतला आतून पोखरून काढलं, तसंच काहीसं माझ्या बहिणीसोबत घडलं आहे. आपल्या देशात पावर गेम चालतो, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे जाणाऱ्या मुला-मुलींना दाबून टाकलं जातं. या इंडस्ट्रीमुळेच आज माझी बहीण आमच्यात नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संचिताच्या भावाने केली आहे.
