वसई: पालिका प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून गेल्या २५ दिवसांपासून विरार पूर्वेतील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात आली नसल्यामुळे महापौरांच्या प्रभागातच स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचा दावा रहिवाशांकडून केला जात आहे. वारंवार बदलणारे कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विरार पूर्वेला प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार अंतर्गत असणाऱ्या सहकार नगर भागात विठूमाऊली कंपाऊंड, शांता जाधव कंपाऊंड, बी. बी. मिश्रा कंपाउंड आणि लक्ष्मण कंपाउंड परिसर आहे. हा परिसर झोपडपट्टीबहुल भागात मोडणारा असल्याने या भागात महापालिकेकडून सार्वजनिक शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या निविदा प्रक्रियेनंतर या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत.
मात्र, त्यानंतरही कंत्राटदाराकडून या शौचालयांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच कंत्राटदाराच्या याच निष्काळजीपणामुळे गेल्या २५ दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांची साफसफाई झालेली नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अस्वच्छ शौचालयांचा वापर करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. तसेच यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सहकार नगरमधील हा झोपडपट्टीबहुल भाग प्रभाग ४ मध्ये मोडतो. या प्रभागातून वसई विरारचे महापौर अजीव पाटील निवडून आले आहेत. मात्र, असे असताना देखील पालिकेकडून आमच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. मूलभूत सुविधादेखील आम्हाला योग्यरित्या जात नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या विरार दक्षिण पूर्व मंडळाचे सरचिटणीस सुनील ठाकूर यांनी दिली आहे.
सहकार नगरमधील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता दैनंदिन करण्यात येते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पाणी येत नसल्याने शौचालयांची साफसफाई करण्यात आलेली नाही. याबाबत संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांशीही चर्चा करण्यात आली असल्याची , माहिती सहायक आयुक्त अश्विनी मोरे यांनी दिली आहे.
