भाईंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगत असलेल्या परिसरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. या बांधकामांमुळे वन जमिनीवर अतिक्रमण झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने वन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून अतिक्रमणांवर कारवाई करावी, असे पत्र पोलीस उपायुक्तांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांना पाठवले आहे.
मिरा भाईंदर शहरातील काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डाचकुलपाडा हा झोपडपट्टीबहुल परिसर आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन हद्दीलगत असून येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. यातील काही बांधकामे वन विभागाच्या जमिनीवर असण्याची शक्यता आहे. मात्र वन क्षेत्राची हद्द निश्चित नसल्याने अतिक्रमणांबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे वन विभागाने या परिसराचे सर्वेक्षण करून हद्द निश्चित करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी पत्रात नमूद केले आहे.नुकतेच चेना परिसरातील जंगलात शिकारीच्या संशयावरून झालेल्या हत्याकांडामुळे वन क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर आता वन हद्दीलगत वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबतही पोलिसांनी चिंता व्यक्त केल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न :-
डाचकुलपाडा परिसरातील अनधिकृत बांधकामांमुळे लोकसंख्येत वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाने जमिनीची हद्द निश्चित करून अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालकांना पत्र पाठवले आहे.
मात्र वन विभागाचे दुर्लक्ष :-
यासंदर्भात पोलीस उपायुक्तांनी वनविभागाला दोन वेळापत्र पत्र पाठवून इशारा दिला आहे. मात्र यावर अदयापही वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
१) ” संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करण्यात आली असून त्याबाबतचे नकाशे हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच टप्प्याटप्प्याने भिंत देखील उभारली जात आहे. त्यामुळे हे काम प्रगतीपथावर सुरू आहे :- प्रदीप पाटील – डीएफओ ( संजय गांधी राष्ट्रीय उद्यान )
२) ” संजय गांधी राष्ट्रीय उद्या उद्याला लगत असलेल्या परिसरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी व वनक्षेत्राचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही वनविभागासोबत पत्र व्यवहार करत आहोत “- राहुल चव्हाण – उपयुक्त परिमंडळ १(मिरा -भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय )
