वसई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. मात्र, सरकारच्या या निर्णयामागे केवळ राजकीय हेतू दडला असल्याचा आरोप करत हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखले जाते. हिरवीगार झाडी, शहराच्या वर्दळीच्या भागात असणारे मोठे उद्यान म्हणून येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक भेट देत असतात. पण, विविध कारणांमुळे चर्चेत असणारे उद्यान शासनाच्या नव्या निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आले आहे.
कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे नाव १९८१ साली उद्यानाला देण्यात आले. तर गेल्या ४५ वर्षांपासून उद्याची ही ओळख तशीच कायम आहे. मात्र, १४ मे रोजी शासनाने प्रधान मुख्य संरक्षकांना या उद्यानास भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.
पण, शासनाच्या या प्रस्तावाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाची भूमिका ही फक्त राजकीय सूडाची आहे. अनेक निसर्ग व वृक्ष प्रेमी जनतेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावाबाबत कधीच विरोध नव्हता. कोणत्यातरी सडक्या विचारांच्या माणसाला नामांतराची खुमखुमी आली आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड.संदेश कोंडविलकर यांनी शासनाच्या प्रस्तावावर संताप व्यक्त केला आहे.
तसेच माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत नितांत आदर आहेच. त्यांच्या नावाने नवीन उद्यान उभारून द्यावे, असेही त्यांनी म्हटले. तर उद्यानाच्या नावात बदल करण्यामागे काही योजना किंवा उपक्रम आहे की फक्त राजकीय हेतूपोटी नामांतर केले जात आहे, असा प्रश्न काँग्रेसचे वसई जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी उपस्थित केला आहे.
अटल बिहारी विद्यापीठाला विरोध नाही
राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात जागतिक दर्जाच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतही प्रस्ताव शासनाकडून प्रधान मुख्य संरक्षकांना पाठविण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावाला कोणताही विरोध नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
