भाईंदर :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी रात्री अचानक भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. तसेच आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

भाईंदर पश्चिम येथे २०० खाटांचे पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय आहे. शहरातील प्रमुख शासकीय रुग्णालय असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. रविवारी रात्री आठच्या सुमारास सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर अचानक रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मात्र कोणत्याही तक्रारीच्या अनुषंगाने ही भेट नसून रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आल्याचे काटकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी प्रसूती कक्ष, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभागासह इतर विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. पाहणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र काही कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार उपलब्ध होत असल्याबाबत काटकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आगामी काळात रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.