अवकाळीमुळे हंगाम लांबणीवर; लागवड करण्यात अडचणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पेश भोईर

वसई: रब्बीच्या हंगामात वसईच्या भागात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे पांढऱ्या कांद्याची लागवड ही लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे बियाणे टाकून त्याचे ही नुकसान झाल्याने पांढऱ्या कांदा उत्पादकांवर संक्रांत आली आहे.

वसईच्या विविध ठिकाणच्या भागात खरिपानंतर रब्बी पिके घेण्यास सुरूवात होत असते. या रब्बी पिकांमध्ये पांढरा कांद्याचीही लागवड केली जाते. वसई तालुक्यातील करंजोण, जांभूळपाडा, तिल्हेर, आडणे, नवसई, भालीवली, मडकीपाडा, यासह इतर ठिकाणच्या भागात कांदा लावला जातो.

 सफेद कांदा आरोग्यासाठी व शरीराची दाहकता कमी करण्यासाठी गुणकारी असल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात कांद्याचे उत्पादन अनेक शेतकरी  घेतात. परंतु यंदाच्या वर्षी अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे टाकलेले बियाणे होते. ते कुजून खराब झाले आहे. बियाणे टाकल्यानंतर त्याला तयार होण्यास पाच ते सहा आठवडय़ाचा कालावधी लागतो. त्यानंतर त्याची लागवड केली जाते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असल्याने लागवड करण्यास ही शेतकऱ्यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.  नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये जर लागवड झाली तर तर फेब्रुवारी, मार्च पर्यंत चांगले पीक तयार होते. सध्या स्थितीत जमिनीतील पाणी व ओलावा अजून कमी न झाल्याने लागवड तरी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे. खरीप संपल्यानंतर कांदा लागवड करण्यासाठी बियाणे पेरले होते परंतु नुकताच झालेल्या पावसात ते बियाणे खराब होऊन नुकसान झाले असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी अशोक भोईर यांनी सांगितले आहे. जर पावसाचे सावट असेच सुरू राहिले तर याचा मोठा परिणाम हा कांदा उत्पादनांवर होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

रब्बीचा हंगामातील पिकांची लागवड लांबणीवर..

खरीप आटोपताच रब्बीला हंगाम सुरू होतो. मात्र डिसेंबर महिना सुरू असतानाही पाऊस पडत असल्याने हंगाम लांबणीवर गेला आहे.  पांढऱ्या कांद्याप्रमाणेच तूर, वाल, हरभरा, चणे ,मूग यासह भाज्यांची लागवड केली जाते. मात्र या पिकांची लागवड ही उशिराने होऊ लागली आहे.

बाजारात कांद्याची आवक घटण्याची शक्यता

पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. मार्च, एप्रिल दरम्यान या कांद्याच्या माळी तयार करून शेतकरी विक्रीसाठी आणतात. मात्र यंदा अवकाळी पावसाचा परिणाम हा  पांढऱ्या कांद्याच्या लागवडीवरही झाला आहे.   शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी शेतात पाणी असल्याने लागवड करता येत नाही. अशी स्थिती आहे त्यामुळे याचा परिणाम कांदा उत्पादनावर होऊन त्याची आवक कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवर्षी आम्ही आमच्या शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड करतो. यावर्षीही पेरणी केली होती. परंतु पावसामुळे त्याची वाट लागली आहे. आता पुन्हा पेरणी करून लागवड करावी लागणार आहे.

अरुण माळवी, कांदा उत्पादक शेतकरी जांभूळपाडा

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankrant white onion growers ysh
First published on: 08-12-2021 at 01:47 IST