वसई : विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाची आखणी व आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेकडून नामांकित संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागून नागरिकांची कोंडीतून मुक्तता होण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत विरार शहराची लोकसंख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. दररोज हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानकाचा वापर करतात. मात्र, स्थानकाबाहेरील बेशिस्त वाहतूक व्यवस्था, प्रवाशांची अलोट गर्दी, रिक्षा-बस स्टँडचा गोंधळ पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा फेरीवाल्यांचे अतिक्रमण त्यामुळे येथून ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शहरात सॅटीस प्रकल्प राबविण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.
याच अनुषंगाने महापालिकेने सॅटिस प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक आणि आर्थिक आराखडा निश्चित करणे, तसेच निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची गरज आहे. यासाठी महापालिकेने भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांची पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेली संस्था परिसरातील वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या स्थितीचा सखोल अभ्यास करणार आहे. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा आणि खर्चाचा अंदाज वर्तवून कंत्राटदार निवडीसाठी तांत्रिक आणि आर्थिक मूल्यमापन करणार आहे. प्रत्यक्ष कामाच्या वेळी गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे आणि तांत्रिक मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही या संस्थेवर असणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
विरार रेल्वे स्थानकात निर्माण होणारी कोंडी सोडवण्यासाठी सॅटीस प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी संस्थेला पत्र पाठवून नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही आम्ही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. :- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका
प्रकल्पामुळे असा होईल फायदा
सॅटीस प्रकल्पामुळे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रकल्पातून प्रवाशांसाठी स्वतंत्र मार्ग आणि टर्मिनल, बस, रिक्षा, खासगी वाहनांसाठी योग्य पार्किंग आणि आगमन-निर्गमन व्यवस्था, तसेच पादचारी पूल व सायकल ट्रॅक सारख्या सुविधा निर्माण होतील. यामुळे वाहतुकीचा गोंधळ आणि अपघात टळतील, आणि स्थानक परिसराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल.
‘सॅटीस’ म्हणजे काय?
सॅटिस प्रकल्प म्हणजे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी राबवण्यात आलेली ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा योजना’ आहे. यामुळे स्थानक परिसरातील गर्दी कमी करणे, पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता आणि वाहतुकीचा सुलभ प्रवाह निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहे.

