वसई: वसई पूर्वेतील सातिवली आरोग्य केंद्रासमोर नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने केंद्रासमोरच कचऱ्याचे ढीग तयार झाले आहे. कारवाई करूनही कचरा टाकण्याचे प्रमाण घटत नसल्याने आरोग्य केंद्रच अस्वच्छतेचे केंद्र ठरू लागले आहे. वसई विरार महापालिकेकडून सातिवली परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी आरोग्य केंद्र व माता बालसंगोपन केंद्र उभारण्यात आले आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात.
मात्र, सातिवली आरोग्य केंद्रासमोरच परिसरातील रहिवाशांकडून कचरा टाकला जात असल्याने या बघतील स्वच्छता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबत स्थानिकांशी संवाद साधला असता, पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नीट कचरा उचलला जात नसल्याची प्रतिक्रिया देविदास केंगार यांनी दिली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे घंटागाडीच्या माध्यमातून या भागातील कचरा दैनंदिन गोळा केला जात असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी या आरोग्य केंद्रासमोर कचरा टाकण्यासाठी कुंडीही तयार करून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नागरिक मोकळ्या जागीच कचरा टाकत आहेत. तसेच दंडात्मक कारवाईसाठी क्लिनअप मार्शल या भागात उभे केले होते. मात्र, त्यांच्यासोबतही येथील रहिवाशांनी वाद घातल्याचे प्रकार समोर आले आहेत, अशी माहिती स्वच्छता निरीक्षकांनी दिली.
