विरार : शहरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असताना आता काही शाळा धोकादायक इमारतीतसुद्धा चालवल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिक्षण माफियांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालवला असताना शिक्षण विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.

वसई विरारमध्ये नुकतेच शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने परवानगीसाठी आलेल्या शाळांचा उल्लेख आहे. पण ज्या शाळा परवानगीसाठी आल्याच नाही, त्यांचा शोध मात्र घेण्यात आलेला नाही. जिल्हा शिक्षण विभागाच्या माहितीनुसार शहरात केवळ ११० अनधिकृत शाळा आहेत. पण त्याहून आणखी अनधिकृत शाळा शहरात असून त्यांची नावेच या यादीत नाहीत. अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी शिक्षण माफिया आणि भूमाफिया त्यात शाळा, विद्यालये, शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे सुरू करताना दिसतात. धोकादायक इमारतींमध्ये शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
social activists demand that hunger strike in front of social welfare office demanding administrator at ashram school
वस्तीगृहात २४० निवासी विद्यार्थी दाखवा अन लाखाचे बक्षीस मिळवा; उपोषणकर्त्यांचे थेट संचालकांनाच आव्हान…
South Mumbai
आमचा प्रश्न – दक्षिण मुंबई : जर्जर इमारती, चिंचोळ्या गल्ल्या अन् अरूंद रस्ते

नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरात दोन अनधिकृत धोकदायक इमारतीत तब्बल तीन शाळा सुरु आहेत. त्याचबरोबर चार शिकवणी वर्ग आणि प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. चार ते पाच वर्षांपूर्वी या इमारतीवर पालिकेने कारवाईसुद्धा केली होती. त्यामुळे भूमाफियांनी शक्कल लढवत तेथे शाळा आणि शिकवणी वर्ग सुरू केले. या इमारतीत भारती अकादमी इंग्लिश स्कूल, नवजीवन अकादमी, सेंट पॉल इंग्लिश हायस्कूल, सेंट थॉमस इंग्लिश स्कूल, आणि इतर शिकवण्या आणि प्रशिक्षण केंद्रे सुरु आहेत. या शाळा साध्याशा गाळय़ामध्ये भरवल्या जात असून मुलांच्या सुरक्षतेच्या कोणत्याही यंत्रणा नाहीत. त्याच बरोबर या दोनही इमारती जर्जर झाल्या आहेत. अनेक ठिकाणी इमारतीचे प्लास्टर उखडले आहे. यातील सळया गंजल्या आहेत. कठडे तुटले आहेत, इमारतीला आपत्कालीन मार्ग नाही. या शाळांमध्ये बालवर्गापासून ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शाळांची कोणतीही तपासणी अद्याप झालेली नाही.

या शाळांची नावे जिल्हा शिक्षण विभागाच्या अनधिकृत शाळांच्या यादीत नाहीत. त्यांना परवानगी दिली असेल तर धोकादायक इमारती असूनही परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न निर्माण होतो.

या इमारती धोकादायक वर्गात मोडतात की नाही याची पाहणी केली जाईल. तसेच इमारतीच्या स्थितीवरून संरचनात्मक चाचणी करून योग्य ती कारवाई करू. – धनश्री शिंदे, सहायक आयुक्त प्रभाग समिती डी

या शाळांसंदर्भात माहिती घेतली जाईल. तसेच या शाळांना परवाने दिलेले आहेत की नाही, याची तपासणी करून चौकशी आणि पाहणी केली जाईल. तसेच योग्य ती कारवाईही करण्यात येईल. – माधवी पाटोळे, गटशिक्षण अधिकारी वसई.