लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : सायबर भामट्यांच्या जाळ्यात भलेभले अडकत असतात आणि त्यांची फसवणूक होत असते. अगदी सेलिब्रेटी आणि पोलीस देखील सायबर भामट्यांच्या फसवणुकीता बळी पडत असतात. मात्र नालासोपारा येथील १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने प्रसंगावधान दाखवून एका सायबर भामट्याचा डाव उलटवून टाकला.

हर्षदा गोहील ही १३ वर्षांची मुलगी नालासोपार्‍यात राहते. तिला एका सायबर भामट्याने फोन केला. तुझ्या वडिलांच्या खात्यात कामाचे १५ हजार रुपये पाठवायचे आहेत. पण त्यांचा संपर्क होत नाही म्हणून तुझ्या खात्यात हे पैसे पाठवतो असे सांगितले. हर्षदाला सुरवातील ते खरे वाटले. तिचे खाते नसल्याने तिने आईचा मोबाईल क्रमांक देऊन तिथे पैसे पाठवायला सांगितले. हर्षदा जाळ्यात फसली असे सायबर भामट्याला वाटले. त्याने सुरवातीला १० हजार रुपये पाठवल्याचा संदेश पाठवला. मी १० हजार पाठवले आता ५ हजार पाठवतो असे हर्षदाला सांगितले. सायबर भामट्याने ५ हजारांऐवजी ५० हजार पाठवल्याला संदेश हर्षदाला पाठवला. चुकून ५ ऐवजी ५० हजार पाठवले असे तिला सांगून उर्वरित ४५ हजार परत करण्यासाठी तिला आग्रह करू लागला.

आणखी वाचा-पहिल्या पावसाचे वसईत दोन बळी, समुद्रात बुडून आणि विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

मात्र ते दोन्ही संदेश बनावट आहे ते हर्षदाच्या लक्षात आले. तिच्या आईच्या खात्यात कुठलेही पैसे आलेले नव्हते, हे तिने फोन सुरू असतानाच तपासले. तो सायबर भामटा तिला वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळ्याचा प्रयत्न करत होता. मात्र हर्षदाने आपल्या आईच्या खात्यात किती पैसे आहेत ते सांगितले नाही आणि त्याला पैसेही पाठवले नाही. मी वडिलांशी कॉन्फरन्स कॉलवर बोलल्यावरच ठरवेन असे ठामपणे सांगितले. त्यामुळे सायबर भामट्याचा डाव फसला.

मला सुरवातील हा प्रकार खराच वाटला होता. त्याने पैसे पाठवल्याचा संदेश पाठवला. मात्र तो बॅंकेच्या खात्यातून न येता त्याच्या मोबाईल क्रमांकावरून आला होता. तेव्हाच मला संशय आला असे हर्षदा म्हणाली. याशिवाय आईच्या खात्यात कुठलेही पैसे आले नव्हते. त्यामुले हा प्रकार बनावट असल्याचे समजल्याने मी त्याला पुढे कसलीच माहिती दिली नाही आणि पैसेही पाठवले नाही, असे हर्षदा म्हणाली. हर्षदाच्या या हुशारीचे सध्या कौतुक होत आहे. हर्षदा या वर्षी ९ व्या इयत्तेत गेली आहे.